पहिल्या दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

17 जून रोजी होणार वाटप ः प्राथमिक शिक्षण विभागाची तयारी अंतिम टप्प्यात

महापालिका क्षेत्रात पाच सेंटर सुरू

पुणे महापालिका हद्दीतील 643 शाळांमधील सुमारे 2 लाख 8 हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील या शाळांना तब्बल 10 लाख 57 हजार पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शहरात हडपसर, येरवडा, नाना पेठ, कोथरूड आणि बिबेवाडी याठिकाणी पाच सेंटर सुरू करण्यात आले आहेत. शाळांना पुस्तकांचे वितरण 17 जूनपर्यंत करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस 17 जूनला पुस्तके वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाने दिली.

पुणे  – समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील शासकीय, महापालिका, नगरपालिका, शासकीय अनुदानित, खाजगी अनुदानित शाळांमधील 8 लाख 42 हजार 22 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहे. बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक शिक्षण विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खाजगी अनुदानित, अशंतः अनुदानित, समाजकल्याण अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो. शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी जिल्ह्यातील 4 हजार 599 शाळांमध्ये तब्बल 25 लाख 68 हजार 134 पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भोर, हवेली, मुळशी, वेल्हा या चार तालुक्‍यांतील पाठ्यपुस्तकांच्या वितरणाचे काम पूर्ण झाले आहे. तालुका गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शाळांना पुस्तकांचे वितरण सुरू असल्याची माहिती प्राथमिकशिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here