“हिरकणी कक्ष’ झाला स्टोअर रुम

मूळ उद्देशाला हरताळ ः चिमुकल्यांना दूध पाजता यावे यासाठी उभारला होता कक्ष

पिंपरी  – गर्दीच्या ठिकाणी आईला आपल्या लहान बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात (एस.टी) हिरकणी कक्षाची निर्मिती केली आहे. बहुतेक सर्व मोठ्या आणि गर्दीच्या एसटी स्थानकांवर हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. “हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्यात आल्यामुळे राज्य परिवहन मंडळाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. याच धर्तीवर आता राज्यातील मोठ्या देवस्थानांमध्ये देखील हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे. परंतु वल्लभनगर आगारात मात्र “हिरकणी कक्षा’च्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात येत आहे. याठिकाणी हिरकणी कक्षाचा वापर स्तनपान करवण्यासाठी नव्हे तर, चक्क स्टोअर रुम म्हणून केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी वीस वर्षांपूर्वी वल्लभनगर आगाराची निर्मिती करण्यात आली आहे. आगारात शासनाकडून विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आगारात मातांना आपल्या लहान बाळांना स्तनपान करता यावे, याकरीता स्वतंत्र हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली. मात्र, आगार प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कक्षात कुठलीही स्वच्छता ठेवली जात नसून उलट स्वच्छता साहित्य ठेवण्यात येत आहे.

एकीकडे पश्‍चिम महाराष्ट्रातील गर्दीच्या देवस्थानांमध्ये हिरकणी कक्ष उभारले जात आहेत. त्यात, आहे त्या एसटी आगारातील हिरकणी कक्षाची ही अवस्था होत असल्याने विरोधाभास दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहर कामगारनगरी म्हणून ओळखले जाते. यामुळे येथून राज्यभरातून नागरिकांची मोठ्या संख्येंने ये-जा असते. मोठ्या संख्येने महिला प्रवासी येथे येत असतात. त्यापैकी कित्येकांना हिरकणी कक्षाची मोठी गरज असते. परंतु हिरकणी कक्षाची अवस्था पाहता महिला तिथे जाण्याचे धाडस करत नाहीत.

लहान बाळांना वेळेवर स्तनपान केले जावे याकरीता, विविध माध्यमातून जनजागृती केली जाते. याचाच भाग म्हणून प्रत्येक आगारावर हिरकणी कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, शासनाच्या मुख्य उद्देशालाच वल्लभनगर आगर प्रशासनाकडून हरताळ फासला जात आहे. हिरकणी कक्षात ठेवण्यात आलेले साहित्य, अस्वच्छता तसेच इतर कामांसाठी होत असलेला हिरकणी कक्षाचा वापर पाहता मातांना या कक्षाचा उपयोग करणे अवघड दिसते. याबाबत आगार प्रशासनाला विचारणा केली असता महिलांना बसायला काय हरकत आहे? या साहित्याचा काय त्रास होतोय? अशा प्रकारची उडवा-उडवीचे उत्तर देण्यात येत आहेत.

वल्लभनगर आगारात स्तनपान करण्यासाठी महिलांकडून हिरकणी कक्षाचा जास्त वापर केला जात नाही. स्तनपान करण्यास आलेल्या महिलांना हिरकणी कक्ष उपलब्ध केला जातो. येथील साहित्याचा त्यांना काही त्रास होत नाही. मात्र, याबाबत दखल घेतली जाईल व येथील साहित्य हटवले जाईल.

– संजय भोसले, आगार प्रमुख, वल्लभनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)