पुणे – पिसोळी येथे ब्रम्हाकुमारी विद्यापीठ लगत डोंगरावर एका 22 वर्षीय विधवा महिलेला दोघांनी बळजबरीने दारु पाजून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी कृष्णा बबन जाधव (रा. हडपसर, पुणे) व अक्षय चव्हाण (उंड्री, पुणे) यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिलेला पोलिसांकडे तक्रार देताना सांगितले, हडपसर येथील घरी ती असताना अक्षय चव्हाण याने तिला फोन करून कृष्णा जाधव यास काहीतरी होत असल्याचे सांगून डी.पी.रोड येथे येण्यास सांगितले. त्यानंतर तिला गोंधळेनगर येथे आरोपी घेऊन गेले. आरोपी कृष्णा व अक्षय यांनी तिला गाडीवर बसवून उंड्री चौकात आणले व तेथील दुकानातून दारुची बॉटल विकत घेऊन तिला पिसोळी येथील ब्रम्हाकुमारी विद्यापीठालगत डोंगरावर घेऊन गेले. त्याठिकाणी तिला शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने दारु पाजली व सामुहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी विधवा असून दोन ते तीन वर्षापासून तीची आरोपी कृष्णा बरोबर ओळख आहे. तर दोघेही आरोपी हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात.