महिन्याभराचे काम अवघ्या आठ दिवसांत पूर्ण
पुणे – शुध्द केलेले सांडपाणी शेतीला देण्यासाठी महापालिकेने मुंढवा येथे उभारलेल्या जॅकवेलच्या परिसरात नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली होती. ही जलपर्णी अवघ्या आठ दिवसांत काढण्याचा पराक्रम महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. या जलपर्णीमुळे त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता.
महापालिकेकडून शहरातील सांडपाणी शुध्दीकरण केंद्रावर शुध्द केलेले पाणी या जॅकवेलच्या ठिकाणी बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. हे पाणी मागणीनुसार, बेबी कॅनॉलमधून शेतीसाठी दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत या परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली होती. त्यामुळे नागरिक तसेच या भागातील नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, आचारसंहितेचे कारणपुढे करत प्रशासनाकडून ती काढण्यात येत नव्हती. मात्र, आठवड्याभरापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांनीही या प्रकल्पाची पाहणी केली असता, या जलपर्णीबाबत नाराजी व्यक्त केली होती. ही जलपर्णी अवघ्या आठ दिवसांत काढण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या किटक प्रतिबंधक विभागाकडून हे काम करण्यात आले असून दररोज सुमारे 40 कर्मचारी, 3 स्पायडरमॅन मशीन, 2 जेसीबी तसेच 3 बोटींचा वापर या कामासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मनावर आणले तर अवघ्या काही दिवसांत नदी जलपर्णीमुक्त करणे शक्य असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.