पुणे – लष्कर परिसरात सातत्याने उद्भवणारी मोबाइल नेटवर्कची समस्या आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत, कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून लवकरच नवीन मोबाइल टॉवर्स उभारण्यात येणार आहे. यासाठी नुकत्याच बोर्डाकडे 33 निविदा आल्या असून, या निविदांसाठी बोर्डातर्फे मंजूरी देण्यात आली आहे. पुढील मंजुरीसाठी या निविदा स्थानिक लष्करी केंद्र आणि संरक्षण मालमत्ता विभाग कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात लवकर परिसरातील मोबाइल नेटवर्क अधिक सक्षम होण्यात मदत मिळणार आहे.
लष्कर परिसरातील विविध भागांमध्ये विशेषत: लष्करी अधिकारी-जवान यांच्या वसाहती असलेल्या भागांमध्ये मोबाइल नेटवर्क अतिशय कमकुवत आहे. यामुळे नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहे. याच तक्रारींची दखल घेत बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत नवीन मोबाइल टॉवर्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बोर्डातर्फे टॉवर उभारणीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. पहिली निविदा ही मार्चमध्ये, तर दुसरी निविदा एप्रिलमध्ये काढण्यात आली होती. मात्र, या दोन्ही निविदांसाठी कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने बोर्डाने मेमध्ये तिसऱ्यांदा ऑनलाइन पद्धतीने निविदा मागविल्या. यावेळी कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 33 निविदा बोर्डाकडे आल्या असून यामध्ये लष्करी जागेसाठी 27, तर बोर्डाच्या अखत्यारितील जागेसाठी 6 निविदा आल्या आहेत. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत याबाबत माहिती देण्यात आली.
या निविदांना लष्करी मालमत्ता विभाग आणि स्थानिक लष्कर प्रशासन या दोन्हींकडून संमती मिळाल्यानंतर टॉवर उभारणीचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून, जलद गतीने टॉवर्सच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी सांगितले.