नवी दिल्ली- पंजाब सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपले सरकारी निवासस्थानही रिकामे केले आहे. हा बंगला आता पंजाब सरकारच्या स्वाधीन केला असल्याचे सिद्धू यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
जून महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ फेररचनेमध्ये सिद्धू यांना पंजाब सरकारमध्ये उर्जा आणि नवीकरणीय उर्जास्रोत मंत्रालय सोपवण्यात आले होते. मात्र सिद्धू यांनी हे नवीन खाते स्वीकारण्याऐवजी 15 जुलैरोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी सुरुवातीला आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे सोपवण्याऐवजी तत्कालिन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला होता.
सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात गेल्यापासून ते आणि अमरिंदर सिंग यांच्यात तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानभेटीदरम्यान सिद्धू यांनी पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेटही घेतली होती. त्यावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांना चंदिगड किंवा अमृतसर येथून निवडणुक लढवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने तिकीट नाकारले होते. त्यामागे अमरिंदर सिंग यांचा हात असल्याचा आरोप सिद्धू दाम्पत्याने केला होता. 6 जून रोजी पंजाब सरकारमधील सिद्धू यांच्याकडील स्थानिक प्रशासन, सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्रालय काढून घेण्यात आले होते.