मुरब्बी आणि सुसंस्कृत राजकारणी – शीला दीक्षित

ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचे आज वयाच्या 81 व्या वर्षी दिल्लीत हदयविकाराने निधन झाले. दिल्लीच्या केंद्रीय राजकारणात दीर्घकाळ स्वत:चे महत्व टिकवून ठेवणाऱ्या एक मुरब्बी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. दिल्लीच्या दरबारी राजकारणात त्यांचे जितके वजन होते तितक्‍याच त्या लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या नेत्या म्हणूनही प्रसिद्ध होत्या. स्वत:चा आब राखून दिल्लीच्या वर्तुळात ज्यांनी दीर्घकाळ राजकारण केले अशा मोजक्‍या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश करावा लागेल.

इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा अनुभव असलेल्या शीला दीक्षित या अल्पकाळासाठी केरळात राज्यापालही होत्या. पण त्यांची खरी राजकीय कारकिर्द गाजली ती दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची. तब्बल पंधरा वर्षे त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्या काळात त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली होती. आणि समोर भाजपचे आव्हान असतानाही त्यांनी दोन वेळा स्वबळावर दिल्लीत कॉंग्रेसची सत्ता आणली होती. दिल्लीच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. आज जी विकसित दिल्ली दिसते आहे त्याचे बरेच श्रेय त्यांचे आहे. दिल्लीत मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारण्यात त्यांचे मुख्य योगदान आहे. चॉंदनी चौकासारख्या भागात मेट्रो होऊ शकते ही संकल्पना सुरूवातीच्या काळात लोकांना हास्यास्पद वाटत होती पण त्यांनी ती वास्तवात आणली आहे. लोकांच्या नेमक्‍या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपायोजना त्यांनी त्या काळात केल्याने त्यांच्या नेतृत्वाला लोकप्रियतेचे वलय लाभले होते.

2009 साली एका प्रख्यात वृत्तवाहिनीने त्यांना बेस्ट पॉलिटीशीयन ऑफ द इयर म्हणूनही गौरवले होते. तथापी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील काही भष्टाचाराची प्रकरणे आणि पक्षांतर्गत गटबाजीला रोखण्यात आलेले अपयश यामुळे त्यांच्या सरकारचा दारूण पराभव झाला. त्यानंतर मात्र त्यांना राजकारणात पुढे अत्यंत अवघड स्थितीला सामोरे जावे लागले. सन 2014 साली त्यांना केरळच्या राज्यपालपदी नेमण्यात आले होते. पण त्या पदाचा त्यांना चार-पाच महिन्यातच राजीनामा द्यावा लागला होता. वृद्धापकाळाकडे झुकलेल्या शीला दीक्षित यांना कॉंग्रेसने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रॉजेक्‍ट करून त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशची निवडणूक लढवण्याचा एक मोठा डाव खेळला होता. पण तो मात्र अर्ध्यावरच सोडून द्यावा लागला होता.

आयुष्याच्या उतारवयात त्यांच्यावर ही उत्तरप्रदेशच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांनीही त्यात हिरीरीने पुढाकार घेऊन गलित गात्र झालेल्या कॉंग्रेसला त्या राज्यात उभारी देण्याचे प्रयत्न हाती घेतले होते. त्यांच्यातील ही जिगर दाद देण्याजोगीच होती. पण कॉंग्रेसने समाजवादी पक्षाशी आघाडी केल्यामुळे शीला दीक्षितांना तेथील नेतृत्व सोडावे लागले. शीला दीक्षित या मुळच्या पंजाबच्या. त्यांचे बरेचसे राजकीय करिअर दिल्लीत घडले. अशा शीला दीक्षितांना कशाच्या आधारावर कॉंग्रेसने उत्तरप्रदेशच्या भावी मुख्यमंत्री म्हणून पुढे केले याचे कोडे लोकांना बरेच दिवस उलगडले नाही. त्यांचे पती विनोद दीक्षित हे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उमाशंकर दीक्षित यांचे चिरंजीव होते. आणि हे दीक्षित कुटुंब मुळचे उत्तरप्रदेशचे होते. त्या अर्थाने त्या उत्तरप्रदेशच्या सुनबाई ठरत असल्याने त्याचा लाभ घेत कॉंग्रेसने उतारवयात त्यांना पक्षाचा उत्तरप्रदेशचा चेहरा बनवण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. त्यांनी 1984 साली लोकसभेची पहिली निवडणुक उत्तरप्रदेशातल्या कनौज मतदार संघातून लढवली होती व त्यात त्या विजयीही झाल्या होत्या.

एवढाच त्यांचा उत्तरप्रदेशच्या राजकारणाशी संबंध राहिला. त्यानंतर मात्र त्यांनी आपला डेरा दिल्लीला हलवला आणि तेथूनच त्यांनी यशस्वी राजकारण केले. दिल्लीत सन 2011-12 सालापासून आम आदमी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी करीत राजकारणातला नवीन प्रयोग अरविंद केजरीवाल यांनी सुरू केला होता.केजरीवालांच्या क्षमतेचा अंदाज घेण्यात शीलाजी कमी पडल्या. अखेर केजरीवालांनीच त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी पराभूत करून दिल्लीत चमत्कार घडवला. त्यातून दिल्लीतील कॉंग्रेसचा पायाच उखडला गेला. वास्तविक पराभवानंतरही शीलाजींचे दिल्लीतील राजकीय वलय कायम होते. पण कॉंग्रेसने अजय माकन यांच्याकडे दिल्ली प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे सोपवल्यानंतर मात्र त्यांनी पडद्यामागेच राहणे पंसत केले. माकन यांच्याशी त्यांचा छत्तीसचा आकडा होता. केवळ माकन यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शीला दीक्षितांनी नंतरच्या निवडणुकांमध्ये आपल्या प्रतिमेचा त्यांना उपयोग होणार नाही याची दक्षता घेतली. आणि माकन यांचा राजकीय हिशोब पुर्ण करण्यात त्या यशस्वी झाल्या. पण आपल्या या व्यक्तीगत रागलोभाने दिल्लीत कॉंग्रेसचे मोठे पक्षीय नुकसान होते आहे याची फारशी फिकीर त्यांनी बाळगली नाही.

मधला काही काळ राजकारणापासून अलिप्तच राहिल्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्यावेळी शीलाजींनी शेवटची लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी वयाच्या ऐंशीचा टप्पाही पार केला होता. त्या पॉलिटकली शेवटपर्यंत ऍक्‍टिव्ह राहिल्या होत्या. गांधी परिवाराशी जवळीक हे त्यांचे ऍडिशनल क्‍वालिफिकेशन होते. त्याच आधारावर राजकारणातील महत्वाची पदे भूषवण्याची संधी त्यांना मिळाली. दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचार हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला लागलेला एक बट्टा होता. त्यातून झालेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा झाकोळली गेली. त्या आरोपांचा प्रभावी मुकाबला करणे त्यांना सहज शक्‍य होते. पण ते झाले नाही. या भ्रष्ट्राचाराला आळा घालणेही त्यांना जमले नाही. एका प्रकरणात तर थेट त्यांच्यावरच आरोप लावला गेला. पण त्यातून त्या सहिसलामत बाहेर आल्या. त्यांच्यावर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अन्यही काही आरोप झाले. पण शीलाजी कशातच अडकू शकल्या नाहीत.

वर नमूद केल्याप्रमाणे आब राखून राजकारण करणाऱ्या त्या एक मुरब्बी राजकारणी होत्या. इतक्‍या प्रदीर्घ राजकीय करिअर मध्ये त्यांच्या नावावर काही लक्षणीय कामगीरी नोंदवली गेलेली नाही असे त्यांचे टिकाकार म्हणू शकत असले तरी त्यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची पंधरा वर्षांची कामगीरी मात्र उल्लेखनीय होती. या अवधीत दिल्लीत जी विकास कामे झाली आहेत त्या योगदानाबद्दल त्या दिल्लीकरांच्या मात्र कायमच्या लक्षात राहतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)