चर्चेत टिकटॉक व्हावे ‘ठीकठाक’

-सागर ननावरे

आजचे युग हे टेक्‍नॉलॉजीचे युग आहे. टेक्‍नॉलॉजी हा माणसाच्या आयुष्याचा जणू एक भागच बनले आहे. पूर्वी मानवाच्या मूलभूत गरजा म्हटल्या की अन्न, वस्त्र आणि निवारा सांगितले जायचे. परंतु बदलत्या काळानुसार त्यात बदल होत गेले. आज मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये “टेक्‍नॉलॉजी’ नामक संकल्पनेचा समावेश केल्यास आश्‍चर्य वाटण्यासारखे नक्‍कीच काही नाही.

टिकटॉक ऍप हा सोशल मीडियामधील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय ऍप आहे. या ऍपद्वारे मोबाइलमध्ये 15 ते 20 सेकंदाचे शॉर्ट व्हिडीओ तयार करून तो शेअर केला जातो. एखादा डायलॉग किंवा गाण्याच्या तालावर थिरकून सोशल प्रसिद्धी मिळविणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो. मुळात टिकटॉक ऍप हे चिनी असून भारतात त्याची विशेष लोकप्रियता पाहायला मिळते. भारतात टिकटॉकचे 20 करोडहून अधिक वापरकर्ते आहेत.

बालक ते वृद्धांनाही टिकटॉकवर प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. टिकटॉकमुळे प्रसिद्धीसाठी हपापलेले अनेक स्त्रीपुरुष, तरुण मुलेमुली, टिनेजर्स, वृद्ध प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागले आहेत. कधी नव्हे ते चित्रपटातील गीते आणि संवादाच्या आधारावर प्रत्येकातील अभिनेता जागृत होऊ लागला आहे. नृत्य, कलाकुसर, अभिनय, कल्पकता यासारखे टॅलेंट या टिकटॉकमुळे प्रकाशझोतात येताना दिसतात. अवघ्या काही दिवसांत मुले-मुली सोशल सेलिब्रिटी म्हणून उदयास येताना दिसतात. त्यातून पुढे लाईक्‍स आणि फॉलोअर्स मिळविण्याची स्पर्धा निर्माण होते. जो तो आपल्यातील वेगळेपण टिकटॉकवर जपण्याचा प्रयत्न करतो.

काहीजण केवळ निखळ मनोरंजन व्हावे या उद्देशाने टिकटॉकवर सक्रिय होतात. परंतु नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे याची दुसरी बाजूही मोठ्या प्रमाणात नजरेस येते आणि मग कुठेतरी मन अस्वस्थ होते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो याची प्रचिती येते. जास्तीतजास्त लाईक्‍स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात अश्‍लीलता, धार्मिक तेढ, आक्षेपार्ह वर्तन आणि वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केले जातात. त्यातून एक जीवघेणी स्पर्धा निर्माण होते. एक अशी स्पर्धा जी माणसाला कोणत्याही थराला नेऊ शकते. सुप्त गुणांना वाव देण्याच्या नावाखाली मनातील असुरी भावना प्रसारित होतात. या असुरी आनंदाचा एक खेळ यातून सुरू होतो. या खेळात अनेकदा जीवही गमवावा लागतो.

अलीकडेच एका युवकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर काही समाजकंटकांनी टिकटॉकचा वापर करीत समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहात पाठविण्यात आले. अनेकजणांना या टिकटॉकवर हिरोपंतीचे स्टंट करताना जीव गमवावा लागला आहे. रेल्वे, समुद्र, धबधबे, रस्ते अशा कोणत्याही ठिकाणाला शूटिंग पॉईंट बनवून सर्रास असे व्हिडीओ बनविले जातात. अनेकदा अनेक धार्मिकस्थळांचे पावित्र्यही या व्हिडीओंमुळे धोक्‍यात येताना दिसून येते. प्रसिद्धीसाठी अश्‍लीलता हा तर या टिकटॉकचा सर्वांत मोठा गैरवापर म्हणावा लागेल.

मुळात या टिकटॉकच्या फायद्यातोट्यांचा विचार केल्यास सध्या फायद्यांपेक्षा तोटेच अधिक दिसून येत आहेत. कुठेतरी याला यावर घालण्याची गरज आहे. टिकटॉकवर अनुचित आणि भीतीदायक व्हिडीओ येत असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. याची दखल घेत मद्रास उच्च न्यायालयाने या ऍपवर देशभरात बंदी घालण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. नंतर सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश उचलून धरला होता. त्यातून पुढे गुगल प्ले स्टोर तसेच ऍप्पल स्मार्ट फोनवरून टिकटॉक काढून टाकावे लागले होते. त्यामुळे नव्याने हे ऍप डाउनलोड करणे अशक्‍य झाले होते. परंतु स्मार्टफोन वापरणाऱ्या स्मार्ट लोकांनी “शेअर इट’सारख्या फाईल ट्रान्सफर ऍपद्वारे या ऍपची देवाणघेवाण सुरू ठेवलीच होती. मात्र मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासमोर एप्रिलमध्ये त्यावर सुनावणी झाली आणि ही बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंडोनेशियानेही टिकटॉकवर अशाच प्रकारची बंदी घातली होती. परंतु काही दिवसांतच बंदी उठवत थोडे बदल आणि अटींसह या ऍपला पुन्हा परवानगी मिळाली. याचा योग्य वापर होण्यासाठी कंपनीने काही बंधने किंवा नियम अटी घालणे गरजेचे आहे. टिकटॉकसारख्या वादग्रस्त ऍपवर थोडंफार का होईना नियंत्रण असायला हवे. या ऍपवर अडल्ट कन्टेंटसाठी फिल्टर लावायला हवा. वयाचे बंधन देऊन त्याच्या वापराबाबत नियमावली व्हायला हवी.

आक्षेपार्ह कन्टेंटला “रिपोर्ट’ किंवा “फ्लॅग’ करण्याची सुविधा उपलब्ध व्हायला हवी. ट्रोलिंगच्या नावाखाली लोकांच्या भावभावनांची, प्रथा परंपरेची जी खिल्ली उडविली जाते यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणायला हवी. या सर्व गोष्टीसाठी तरुणांनीच पुढाकार घेऊन एक संघटनात्मक चळवळ उभी करायला हवी. प्रत्येकाने सद्‌सद्विवेक बुद्धीने याचा वापर सुप्त गुणांना वाव देण्यासाठी किंवा केवळ मनोरंजनासाठी करावा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.