‘एमएसआरडीसी’ रिंगरोडला ‘विशेष’ दर्जा

पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडला सार्वजनिक बांधकाम खात्याकडे “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा “एमएसआरडीसी’चा रिंगरोड हा राज्यातील दुसरा महामार्ग ठरला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला रिंगरोड 2007 पासून प्रादेशिक विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला होता. ऑगस्ट 2011 मध्ये शासनाने “एमएसआरडीसी’च्या रिंगरोडला मान्यता दिली. शासनाकडून रिंगरोडच्या अंमलबजावणीसाठी “एमएसआरडीसी’ची नियुक्ती करण्यात आली. या सर्व प्रक्रियेदरम्यान “एमएसआरडीसी’समोर अनेक अडथळे आले. त्यामुळे प्रादेशिक विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोडऐवजी नव्याने रिंगरोडची आखणी”एमएसआरडीसी’कडून करण्यात आली. नव्याने आखण्यात आलेल्या रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम झाल्यामुळे तो राज्य सरकारच्या पायाभूत समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी या रिंगरोडला “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देण्यात यावा, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविण्याचा निर्णय “एमएसआरडीसी’कडून घेण्यात आला. त्यानुसार हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास सार्वजनिक बांधकाम खात्याकडून “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे, लवकरच त्याबाबतचे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)