लखनौ – मोदी गुजरात मध्ये माझ्यापेक्षा जास्त काळासाठी मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. तथापी त्यांची तेथील कारकिर्द केवळ गुजरातच नव्हे तर संपुर्ण देशावरील काळा डाग ठरली आहे अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे.
मोदींनी काल सपा-बसपा आघाडीवर टीका करताना म्हटले होते की मी सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहिलो केंद्रातही सत्तेवर आहे पण मी संपत्ती कमावलेली नाही. माझी संपत्ती ते दाखवू शकतात काय असे आव्हानही त्यांनी दिले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मायावती यांनी म्हटले आहे की आज देशातील सर्वात जास्त बेनामी संपत्ती भाजप नेत्यांच्याच नावावर जमा आहे.
मोदी हे केवळ कागदावरच प्रामाणिक आहेत, जसे ते केवळ कागदावरचेच ओबीसी आहेत अशी टीकाहीं त्यांनी केली आहे. मोदींच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशात पुर्ण अराजक, तणाव, हिंसाचार आणि द्वेषाचे वातावरण निर्माण झाले होते असा आरोपहीं मायावती यांनी केला आहे. त्यांना देशाची संस्कृती आणि घटनेचा सन्मान राखता आला नाही. पंतप्रधानपदावर बसण्यास मोदी अपात्र आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे.