मेहुल चोक्‍सीच्या 25 कोटींच्या मालमत्तेवर टाच

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी भारताला हव्या असणाऱ्या मेहुल चोक्‍सीला सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) आज पुन्हा एक दणका दिला आहे. मेहुल चोक्‍सीच्या सुमारे 24.77 कोटी रुपयांच्या मालमेत्तवर आज ईडीने टाच आणली आहे. या कारवाईत ईडीने दुबईतील काही व्यावसायिक मालमत्ता, मर्सिडीज बेन्ज कारसह देशांमधील बॅंकांमध्ये असलेले फिक्‍स डिपॉझिट जप्त केले आहेत.

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांनी पीएनबी बॅंकेत कर्ज घोटाळा करुन परदेशात पोबारा केला आहे. मात्र, सीबीआय आणि ईडीकडून मनी लॉंड्रींग कायद्यांर्तगत या दोघांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरुच आहे. या कारवाईत आतापर्यत एकूण 6,097.73 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वीही ईडीने नीरव मोदीच्या 9 आलिशान कार जप्त केल्या होत्या. या घोटाळ्यातील दुसरा आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्‍सीच्या संपत्तीवरही ईडीची कारवाई सुरु आहे.
मामा-भाच्याच्या या जोडीने पीएनबीत साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)