इम्रान खान घेणार ट्रम्प यांची भेट

22 जुलै रोजी होणार दोघांमध्ये चर्चा

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे 22 जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांची भेट घेणार असून या भेटीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करणार असल्यावे वृत्त मिळाले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्यासंदर्भातले एक पत्र व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आले असून या दोघांची ही पहिलीच भेट असणार आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यातच इम्रान खान यांना अमेरिकेला बोलावले होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने इम्रान खान जाऊ शकले नाही. आता ही भेट 22 जुलै रोजी होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही देशांमधली शांतता, स्थैर्य आणि आर्थिक मुद्‌द्‌यांवर या भेटीत चर्चा होणार असल्याचीही माहिती आहे. त्याचप्रमाणे दहशतवादाचा बिमोड करणे, सुरक्षा, व्यापार या विषयांवरही चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.