कंदहार (अफगाणिस्तान)- तालिबान्यांनी हाकलून दिलेल्या अफगाणिस्तानातील शांततावादी कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा आपल्या शांतता मोर्चाला सुरुवात केली. “पीपल्स पीस मुव्हमेंट’ या नावाने सुरू असलेल्या या चळवळीला गेल्या वर्षी देशभरात सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी या गटाने शांततेचा संदेश देण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये आणि राजधानी काबुलमध्ये शेकडो किलोमीटरचा प्रवास केला होता. या विधायक चळवळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
याच “पीपल्स पीस मुव्हमेंट” मधील 30 सदस्यांनी 27 मे रोजी आपल्या उपक्रमाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे. देशाच्या नैऋत्येकडील हेमंड प्रांताची राजधानी लष्कर गाह येथून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. रविवारी घुसखोरांच्या ताब्यातील प्रांतात प्रवेश केल्यावर तालिबान्यांनी या गटातील चौघाजणांना आपल्या वाहनातून नेले.
तर उर्वरित बहुतेक सर्वांना सोमवारी तालिबान्यांच्या वाहनातून दूर नेण्यात आले. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र आपले अपहरण झाले नव्हते, असे या गटाचे प्रमुख बिस्मिल्ला वलांदोस्त यांनी गुरुवारी सांगितले. तालिबान्यांच्या ताब्यातील क्षेत्रामध्ये मोबाईल चालत नसल्याने ते इतरांशी संपर्क साधू शकत नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
हा गट आता लष्कर गह येथे ते परतीच्या मार्गावर असून “पीपल्स पीस मुव्हमेंट’ला मिळालेल्या यशाबाबत शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देणार आहेत.