लोकसभेसाठी कराड-पाटणला सरासरी 61 टक्के मतदान

कराड – लोकसभा निवडणुक मतदानासाठी कराड दक्षिण, कराड उत्तर सह पाटण तालुक्‍यातील मतदारांनी मंगळवारी आपल्या मतदानाचा हक्‍क बजावला. कराड व पाटण तालुक्‍यात सरासरी 61 टक्के मतदान झाले. कराड तालुक्‍यात उंब्रज, कालगाव, जुळेवाडी, कराड नगरपालिका शाळा क्र.2 या केंद्रावरील मतदान मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रकार घडले. एकंदरीत कराड, पाटण तालुक्‍यात लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार पाटण तालुक्‍याचे सुपुत्र नरेंद्र पाटील, कराड तालुक्‍याचे सुपुत्र पंजाबराव पाटील यांनी टाळगाव या आपल्या गावातील मतदान केंद्रामध्ये जावून मतदान केले.

पहिल्या टप्प्यातील मतदानास प्रारंभ झाला. सकाळी सात ते नऊ यावेळेत कराड उत्तरेत 6.62 टक्के मतदान झाले. तर कराड दक्षिणेत 6.20 टक्के मतदान झाले. तसेच पाटणला पहिल्या टप्प्यात 7.28 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सकाळी नऊ ते अकरा या वेळेत कराड उत्तरला 12.7 टक्के मतदान, कराड दक्षिणेला 10.94 टक्के मतदान तर पाटणला 10.82 टक्के मतदान झाले. सुरुवातीच्या दोन टप्प्यात मतदारांनी सर्वत्र अल्पसा प्रतिसाद दिला. दुसऱ्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूर विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी मतदान केले.

दरम्यान, कराड तालुक्‍यातील जुळेवाडी येथे मतदान केंद्रावर बंद पडलेले मशीन लगेच सुरू केल्याने मतदान सुरळीत झाले. उंब्रजमध्ये मतदान केंद्र क्रमांक 214 मध्ये मतदान मशीन 11 वाजता बंद पडल्याने मतदारांची गर्दी वाढली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी दुसरे मशीन दिल्याने मतदान चालू झाले. नगरपालिका शाळा क्र. 2 मधील केंद्रावर दोन मशीन बंद पडली होती. एकूण सहा टप्प्यातील आकडेवारीचा विचार करता पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी अल्पसाच प्रतिसाद दिला. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदारांनी बऱ्यापैकी मतदानाचा हक्‍क बजावला. पाचव्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजता कराड उत्तर 56. 49, कराड दक्षिण 56.22 तर पाटणला 50.36 टक्के मतदान झाले.

या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने विठामाता विद्यालयात केवल महिला अधिकारी असलेले सखी मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आले होते. या केंद्राचे प्रवेशद्वारातच मतदारांच्या स्वागतासाठी कमान तयार करण्यात आली होती. तर याठिकाणी मतदान करायला येणाऱ्या प्रत्येक मतदाराला गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जात होते. तर सगाम विद्यालयात मतदारांसाठी आयडियल मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. याठिकाणी मतदारांसाठी गालीचा, थंड पाण्यासह सर्व भौतिक सुविधा करण्यात आल्या होत्या. तर काही केंद्राच्या ठिकाणी सेल्फी कॉर्नरचीही निर्मिती करण्यात आल्याने मतदारांनी याठिकाणी मतदान केल्याची निशाणी दाखवत सेल्फी घेण्याचा आनंद घेतला.

हेळगावला 65 टक्के मतदान
हेळगाव : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सरासरी 60 टक्के मतदान झाले. कडक उन्हाळामुळे दुपारी मतदार राजाने मतदान केंद्राकडे पूर्णपणे पाठ फिरवली. अपंगांसाठी व्हीलचेअर, मतदारांना रांगेत उभे करण्यासाठी स्वयं सेवक नेमले होते. दिलेले मत हे नेमके कशाला दिले हे आपणास दिसत असल्याने मतदारांना याबद्दलची कुतूहलता निर्माण झाली होती.

पाटणला 61 टक्के मतदान
पाटण : लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाटण विधानसभा मतदारसंघातील 394 मतदान केंद्रावर सरासरी 61 टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदान संपेपर्यंत जवळपास 25 पेक्षा जास्त इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने निवडणूक यंत्रणेची चांगलीच दमछाक उडाली. तालुक्‍यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी मंद्रुळकोळे याठिकाणी सपत्नीक मतदान केले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर तसेच सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण येथे मतदान केले तर आमदार शंभुराज देसाई यांनी मरळी येथे मतदानाचा हक्क बजावला. नाटोशी, पांढरपाणी, बिबी, आडुळ गावठाण, नवसरवाडी तसेच विहे झोनमधील उत्तरतांबवे सहित अनेक मतदान केंद्रातील इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रीया ठप्प झाली. तात्काळ पर्यायी मशीन उपलब्ध करण्यात आल्या. तालुक्‍यातील बाजारपेठ व रस्त्यावर येणारी मतदान केंद्रे पाटण मल्हारपेठ, नवारस्ता, ढेबेवाडी, विहे येथील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह होता. मात्र ग्रामीण भागात भौगोलीक परिस्थितीमुळे काही मतदान केंद्रांवर मतदारांचा ओघ कमी जाणवत होता.

सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ आठ टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची सरासरी पस्तीस टक्‍क्‍यांवर गेली. तालुक्‍यात मोबाईल नेटवर्कची समस्या मोठी असल्याने काही अडचण आल्यास मतदान केंद्रावर तात्काळ संपर्क साधणे अवघड जात होते. सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची टक्केवारी 52.09 इतकी होती. त्यामध्ये एकूण पुरूष मतदान 75965 झाले होते. तर एकूण 79149 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा मतदानाचा टक्का हा वाढलेला दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)