अवैध वाळूतस्करी विरोधात श्रीगोंद्यात कारवाई

file photo

9 वाहनांसह वाळूसाठा जप्त; 12 जणांना घेतले ताब्यात

श्रीगोंदा  – तालुक्‍यातील अवैध वाळूतस्करी विरोधात कारवाईचा बडगा उगारत अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने सांगवी दुमाला येथील भीमा नदी पात्रात कारवाई करून चार जेसीबी, चार ट्रॅक्‍टर, एक ट्रक, चाळीस ब्रास वाळूसाठा जप्त करून बारा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. वाळूतस्करी रोखण्याबाबत महसूल विभाग उदासीन असताना पोलीस प्रशासनाने अवैध वाळूतस्करी विरोधात केलेली कारवाई महसूलच्या डोळ्यात अंजन घालणारीच म्हणावी लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत सविस्तर असे की, गेल्या आठवड्यात तालुक्‍यातील बनपिंप्री येथे वाळूतस्करांनी प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर प्रकार घडला होता. या घटनेवरून पोलीस व महसूल प्रशासनात वादाला तोंड फुटले होते. प्रांताधिकारी दानेज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर देखील तालुक्‍यात खुलेआम वाळूतस्करी सुरूच होती. महसूल प्रशासन वाळूतस्करीकडे सोयीस्करपणे कानाडोळा करीत असल्याचे चित्र होते.अखेर सोमवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाने अवैध वाळूतस्करी विरोधात पाऊल टाकून कारवाईचा बडगा उगारला.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सांगवी दुमाला येथील भीमा नदी पात्रातून वाळूउपसा करणारे चार जेसीबी, चार ट्रॅक्‍टर, एक ट्रक या वाहनांसह सुमारे चाळीस ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी या कारवाईत बारा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, एकीकडे प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन देखील अवैध वाळूतस्करी विरोधात महसूल विभाग कारवाई करण्याबाबत उदासीन दिसत आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने अवैध वाळू तस्करीविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.पोलीस प्रशासनाने अवैध वाळू तस्करीविरोधात केलेली धडक कारवाई महसूल प्रशासनातील अधिकारी अन्‌ कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारीच म्हणावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)