HBD Sachin Tendulkar : भन्नाट…आणि अवलियाच तो!

–  प्रसाद खेकाळे

चड्डी कशी घालायची? हे ज्या वयात कळतसुद्धा नव्हतं, तेव्हापासून आमची आणि ‘सच्चीन’ची ओळख! आम्ही जेव्हा पाळण्यात अंगाईगीत ऐकत झोपायचो, तेव्हा हा माणूस पाकिस्तानी बॉलर्सच्या तोफखान्याला तोंड देत होता आणि आम्ही जेव्हा कामधंद्याला लागलो, तेव्हाही हा खेळतच होता. अरे, हा माणूस आहे की मशीन? नुसता खेळतो राव? एक अख्खी पिढी या ‘सच्चीन’नं क्रिकेटसोबत मोठी केली.

यशाची कितीही शिखरं पार केली, तरी पाय जमिनीवरच कसे ठेवायचे हे या माणसानं आमच्या पिढीला शिकवलं आणि म्हणूनच, की काय हा माणूस तीन पिढ्यांसाठी ‘क्रिकेटचा देव’ झाला. जिवंतपणी एखाद्याला अशी उपमा मिळणं कठीणच! पण, या माणसांनं ती मिळवली? नाही, तर ती त्याच्याकडे चालत आली. कारण, कर्तृत्वच तसं…
मागे सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत होती. ‘आयुष्य पाहिजे सचिन तेंडूलकरसारखं… चाळिसाव्या वर्षी निवृत्ती..भरपूर संपत्ती…प्रसिद्धी…आणि बरंच काही…’ पण, हे सचिनला कसं साध्य झालं? त्याने ते कसं मिळवलं? यावर आतापर्यंत बोलून, लिहून झालंय..

सचिन या नावानं तमाम क्रिकेटरसिकांच्या मनावर राज्य केलंय. खेळाडू म्हणून तो खेळलाच, पण आपल्या दिलदार स्वभावानं त्याने अनेक नव्या खेळाडूंसमोर आदर्श निर्माण केलाय.. सर डॉन ब्रॅडमन, राहुल द्रविड, ख्रिस गेल, मायकल बेव्हन, अझरूद्दीन, सेहवाग आणि सर्व प्रसिद्ध खेळाडू या माणसात एकत्र आले आहेत. सचिनची क्रिकेट कारकीर्द आमच्या पिढीला अक्षरशः तोंडपाठच होती..अजूनही आहे..म्हणूनच तो भन्नाट…

सायमंड्ससारखी मग्रुरी आणि श्रीशांतसारखा उतावीळपणा या सचिननं कधीच दाखवला नाही..हरभजनसारखी ‘सिनियरगिरी’ दाखवली नाही…म्हणूनच तो देवमाणूस ठरला.

सतत २४-२५ वर्षे क्रिकेट खेळणं म्हणजे चेष्टा आहे का? आपल्या आईनं जरी बॉलिंग केली आणि मामा जरी फिल्डिंगला थांबला, तरी इतकं खेळणं अशक्यच! त्यात कितीतरी दुखापती, टीका आणि टोमणे यांचे बॉल या माणसानं ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ केले. क्रिकेटमधलं गलिच्छ राजकारणदेखील पचवलं… कॅप्टनपद सोडल्यावर कुठलाही होरा आणि ‘दादा’गिरी न दाखवता येणाऱ्या नवीन कॅप्टनच्या सुचनेनुसार हा खेळतच राहिला, नव्हे तो आणखी बहरला. कसोटी क्रिकेट असो, की टी-२० प्रत्येक फॉरमॅटमध्ये हा माणूस तितकाच फॉर्मात होता..जर त्यानं स्वतःला सिद्ध केलं नसतं, तर कुठल्यातरी चॅनेलवर ‘क्रिकेट कसं खेळावं आणि कसं खेळायला पाहिजे होतं’ हे सांगताना कधीच दिसला असता..कदाचित हीच शिकवण या सचिननं आम्हाला दिली…

तसे त्याच्या बॅटमध्ये सर्वच फटके..पण, त्यात सचिनचा मला आवडलेला शॉट म्हणजे…सेहवागनं शोयेब अख्तरला मारलेला डायलॉग ’उधर देख..तेरा बाप खडा है..उसको बाउन्सर डाल’ आणि त्यानंतर सचिननं बॅकवर्ड पॉइंटला मारलेला ‘स्मॅशिंग’ सिक्सर..बॉल हवेत असताना काही सेकंदासाठी धस्स..झालं होतं राव!

बरं, या माणसाला विशेषणंदेखील तितकीच. त्यात मला आठवणारं एक म्हणजे ‘अवलिया…’ त्याचा एक किस्सा आहे. ‘२००८-०९ मध्ये पत्रकारितेत मी अगदी नवखा होतो. आमच्या जिल्ह्यातील एका राजकीय व्यक्तीवर मला लेख लिहायचा होता. दोन दिवस आधी वरिष्ठांनी मला असाइन्मेन्ट दिली आणि ते सुट्टीवर गेले. लेख प्रकाशित झाला..शीर्षक होतं ‘अवलिया नेता..’ ऑफिसला आल्यावर वरिष्ठांनी ते शीर्षक वाचलं आणि बोलले ‘घरी बस.. असलं हेडिंग का दिलं? तो नेता म्हणजे काय जोकर आहे का? त्याला अवलिया का म्हटलास?’ दिवस तसाच टेन्शनमध्ये गेला. तिकडं या सचिननं काहीतरी अचाट पराक्रम गाजवला. दुसऱ्या दिवशी मुंबईच्या एका पेपरमध्ये ‘अवलिया सचिन’ असं छापून आलं. मग काय? गेलो साहेबांकडे आणि बोललो…’सचिन काय जोकर आहे काय? काहीपण छापतात लोक..’ साहेब हसले आणि बोलले ‘जावू दे..’ आईशप्पथ सांगतो..मला सचिननं वाचवलं…म्हणूनच तो माझ्यासाठी अवलियाच आहे…

आज या माणसाचा ४५ वा वाढदिवस.. या संपूर्ण लेखात सचिन तेंडूलकर या व्यक्तीबद्दल मी सर्व एकेरी ‘अरे-तुरे’ शब्द वापरले आहेत. कारण, माझ्यासह तमाम भारतीयांना क्रिकेट जगणाऱ्या रसिकांना तो आपला वाटतो. आमच्यासोबत मोठे झालेले भारतरत्न सचिन तेंडूलकर खासदार झाले…भविष्यातही त्यांना अनेक मोठे सन्मान मिळतील…पण, आमच्यासाठी आणि आमच्या पोराबाळांसाठी तो ‘सच्चीन’च असेल. कारण, या माणसाचं महात्म्य पुढच्या पिढीकडे आपोआप हस्तांतरित होणार आहे.

लाडक्या भारतरत्न सच्चीनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….

Ads

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)