पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तब्बल 7 हजार कोटी खर्चून उभारल्या जाणाऱ्या महापालिकेच्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) संयुक्त जमीन मोजणी पूर्ण होऊन दीड महिना झाला तरी महापालिकेस अद्याप या मोजणीचे नकाशे मिळालेले नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून नगरभूमापन विभागास पत्र पाठवून तातडीने नकाशे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. हे नकाशे मिळत नसल्याने नेमक्या कोणत्या आणि किती जगांचे भूसंपादन करायचे तसेच त्यासाठीचे मूल्यांकनाचे कामही रखडले असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या रस्त्यासाठीच्या जागेत सुमारे 40 टक्के पालिकेकडे असून 24 टक्के खासगी तर 36 टक्के शासकीय विभागांची जागा आहे.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे 36 किलो मीटरचा हा संपूर्ण उन्नत रस्ता विकसित केला जाणार आहे. या मार्गासाठी पालिकेला विविध सरकारी विभागांची जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी, गेल्या महिन्यात 3 मेपासून पालिका आणि नगर भूमापन अधिकाऱ्यांमार्फत संयुक्त मोजणी सुरू करण्यात आली आहे. या मोजणीचे काम 18 मे रोजी अवघ्या 15 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून ही मोजणी 90 टक्के काम पूर्ण झाली होती. त्यामुळे महिन्याभरात या मोजणीचे नकाशे मिळतील असे गृहीत धरून महापालिका प्रशासनाकडून कामाचे नियोजन करण्यात आले होते.
मात्र, या मोजणीला दीड महिना होत आला तरी अद्याप संयुक्त मोजणीचे नकाशे न मिळाल्याने हे पत्र पाठविण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या 36 किलो मीटरच्या अंतरात 40 टक्के जागा महापालिकेची असून 24 टक्के जागा खासगी तर 36 टक्के जागा शासकीय विभागांची असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
प्रकल्पासाठी महापालिकेकडून मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत केवळ दोनच कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या कागदपत्रांची छाननी महापालिका प्रशासनाकडून सुरू असून ही अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच या छाननीनंतरच या निविदा स्वीकारायच्या की नाहीत हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे लवकरच हे काम या निविदांमधून होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.