प्रासंगिक : मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा महामेरू : प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड

-दिलीप फलटणकर

3 फेब्रुवारी 2019 रोजी एमआयटी शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या अनेक मान्यताप्राप्त विद्यापीठांचे कुलपती दूरदर्शी -शिक्षणयोगी प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड सर हे 79 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.

लातूरजवळील रामेश्‍वर (रुई) या खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले व स्वकर्तृत्वावर शिक्षण क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवून अमेरिकेच्या “साल्ट लेक सिटी’तल्या धर्मपरिषदेत आपल्या विचारांतून संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारे प्रा. डॉ. कराड म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठच आहे. आज त्यांच्याच नावे कोथरूड संकुलात “डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ’ राज्य शासनाच्या मान्यतेनुसार कार्यरत झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शैक्षणिक गुणवत्ता, परीक्षा, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, भारतीय संस्कृतीवर आधारित वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्‍तिमत्त्व विकास प्रमाणपत्र परीक्षेचा त्यांनी ध्यास घेत हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी तडीस नेले आहे. आपला विद्यार्थी केवळ पदवीधर किंवा सुशिक्षित होता कामा नये. त्याच्या शिक्षणात संस्कृतीचा ओलावा असावा. तो सुसंस्कृत व्हावा, असा त्यांचा आग्रह आहे. गणवेश, विश्‍वशांती प्रार्थना, पसायदान या गोष्टी शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात आणण्याचे अतिशय महत्त्वाचे व अवघड कार्य त्यांनी केले आहे. चांगल्या गोष्टीसाठी आग्रही भूमिका घेण्याचा त्यांचा स्वभाव यामुळेच एमआयटीचे शिल्प घडले व ही संस्था नावारूपाला आली.

आज शिक्षणक्षेत्रातील विविध विद्याशाखा जसे अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, नौकाअभियांत्रिकीशास्त्र, तंत्रनिकेतन, फॅशन टेक्‍नॉलॉजी, वास्तुविशारद महाविद्यालय, जैवअभियांत्रिकी महाविद्यालय, कायदाशास्त्र, चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, संगीत कला अकादमी, राज कपूर मेमोरिअल, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍वशांती प्रार्थनागृह व विश्‍वशांती ग्रंथालय, गुरूकुल पद्धतीच्या शाळा, इंग्रजी/मराठी माध्यमाच्या शाळा, एमआयटी-आर्टस्‌ डिझाईन टेक्‍नॉलॉजी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर, डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, कोथरूड, पुणे, अवंतिका युनिव्हर्सिटी, उज्जैन (मध्य प्रदेश), युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंट, शिलॉंग, मेघालय, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, अमरावती (आंध्र प्रदेश) आदी विद्यापीठांचा विस्तार कराड सरांच्या कल्पक नेतृत्वाखालीच होत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे विश्‍वराज हॉस्पिटल म्हणजे शिक्षणाबरोबरच जनसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन आपण आभियांत्रिकीबरोबर धन्वंतरीचे’ उपासक आहोत, हेही त्यांनी दाखवून दिले आहे.

भारतातील नामवंत शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, धर्मपंडित, शिक्षणतज्ज्ञ, थोर विचारवंतांच्या विश्‍वशांती प्रतिनिधी मंडळासोबत’ 7 जानेवारी 2018 रोजी अयोध्या येथे भेट देऊन त्या ठिकाणी “विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाची’ एक अभिनव व वैशिष्ठ्यपूर्ण संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. विज्ञान व अध्यात्म यांच्या समन्वयातून जगात शांतता नांदेल, या संकल्पनेनुसार शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांना बरोबर घेऊन ते कार्यरत आहेत. स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचे प्रतिबिंब एमआयटीच्या कार्यप्रणालीत दिसून येते.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी राजबाग, लोणीकाळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात उभ्या राहात असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या घुमटाकार अशा “संत ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍वशांती प्रार्थनागृहाच्या कलशारोहणाचा सोहळा संपन्न झाला. लोणी काळभोर येथील विश्‍वराजबाग परिसरातील एमआयटी-आर्ट, डिझाईन टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या प्रांगणात तत्त्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर प्रार्थना सभागृह व ग्रंथालय साकारलेले आहे. ही वास्तू स्थापत्य कलेचा एक मेरूमणी ठरणार आहे. या वास्तूला आच्छादणारा घुमट हा जगातील सर्वात मोठा घुमट ठरला आहे. जगभरातल्या विविध भाषांमधले अनमोल आणि दुर्मिळ ग्रंथ या ग्रंथालयाला संपन्न करणार आहेत.

दि. 02 ऑक्‍टोबर 2018 या दिवशी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या वास्तूचे लोकार्पण झाले. विश्‍वाला शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रा. कराड यांच्या नेतृत्वाखाली दि. 02 ते 05 ऑक्‍टोबर 2018 या दरम्यान जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञान परिषद या प्रार्थनागृहात संपन्न झाली.

गुरूशिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, असे कराड यांच्या बोलण्यातून समजते. झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा’ असेच त्यांचे मला एकाच वचनात आदराने वर्णन करावे लागेल. “जिवेत शरद: शतम्‌!’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)