इंदापूर तालुक्यातून माती परिक्षण साठी गावाची निवड
रेडा- पंधारवाडी (ता. इंदापूर) येथे कृषि विभागामार्फत उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधारवडा अभियान, अंतर्गत शेतकऱ्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषि सहाय्यक ए.एच.कलाल यांनी हुमणी अळी नियंत्रण व मका पिकावरील लष्करी अळीचे नियंत्रण याविषयी शेतकऱ्याना मार्गदर्शन केले.
तालुका कृषि अधिकारी सुर्यभान जाधव यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली तसेच राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका अभियान 2019-20 मध्ये तालुक्यातून तिसऱ्या सायकल मध्ये पंधारवाडी गावाची निवड केली असून यामध्ये 8अ उताऱ्यानुसार सर्व शेतकऱ्यांचे माती नमुने 766 काढून तपासणीसाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापूर येथे पाठविण्यात येणार असून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर येणारा अहवाल शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे तसेच गावात जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार सुक्ष्म मुलद्रव्यांचे खत व्यवस्थापनासाठी मापदंडानुसार देय अनुदानावर खतांचा येत्या हंगामात वापर करावयाचा आहे.
नोंदणीकृत अशासकीय प्रयोगशाळांना मृद नमुन्यातील सर्व 12 घटकांची तपासणी करणे बंधनकारक राहील तसेच मृद आरोग्य पत्रिकेची रंगीत प्रिंट मिळणार आहे. सुक्ष्म मुलद्रव्ये व भुसुधारक वापराच्या प्रात्यक्षिकांना प्रती प्रात्यक्षिक प्लॉटला 2500 रुपये हे मर्यादेत अर्थ सहाय्य मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच दिगंबर निंबाळकर, किसनराव भगत, महेश निंबाळकर, व्यंकट भोसले, पोलीस पाटील महेश निंबाळकर सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते.