शिरूरमध्ये विजयी कोण होणार, उत्सुकता शिगेला

अनेक कार्यकर्त्यांनी देवाला नवस केला

लाखणगाव- लोकसभा निवडणुकीचा निकाल जसजसा जवळ येऊ लागला आहे. तसतशी निकालाबाबत कार्यकर्त्यांमध्ये धडधड वाढू लागली आहे. समर्थक कार्यकर्ते छातीठोकपणे आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे तेथील राजकीय चर्चा ऐकणारेही अवाक होतात. विजयी कोण होणार याबाबत पैजांना ऊत आला आहे. काहीजण ज्योतिषाकडे जाऊन कोण निवडणूक जिंकणार याची चाचपणी करीत आहेत. माझा उमेदवार विजयी व्हावा, म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी देवाला नवस केला आहे. जशीजशी मतमोजणीची तारीख जवळ येत आहे, तशी कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चा गरमगरम होऊ लागल्या आहेत.
शिरुर लोकसभा मतदार संघाचा एकंदर विचार करता शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारचे मतदार या मतदारसंघात असून प्रत्येक ठिकाणचे मुद्दे, विकास तेथील समस्या याबाबत मोठ्या प्रमाणावर विरोधाभास दिसून येतो. त्यामुळे येणाऱ्या गुरुवारी (दि. 23) विजयी निकाल कोणाच्या बाजूने लागणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काही अपक्ष उमेदवार कोणाची मते खाणार यावरच विजयाचे गणित अवलंबुन आहे. विवाह समारंभात एकत्र आलेली वऱ्हाडी मंडळी, दशक्रिया, वाढदिवस, ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर किंवा हॉटेलमध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात कोण विजयी होणार यावरच चर्चा सुरू असतात.

चर्चा करताना कार्यकर्ते एकदम आक्रमक होताना दिसून येत आहेत. शहरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपाला अनुकूल असल्याचा तर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अनुकूल असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. उमेदवार अथवा त्यांचे समर्थक छातीठोकपणे आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगतात. त्यामुळे तेथील राजकीय चर्चा ऐकणारेही अवाक होतात. निवडुन कोण येणार याबाबत पैजांना ऊत आला आहे. निकालाचे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघात विजयी कोण होणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयाचा चौकार मारणार की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)