रेल्वे प्रवाशांत दगडफेकूंची दहशत

वाढत्या घटना रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान : प्रवाशांच्या जीवितास धोका

पुणे – रेल्वे गाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे कृत्य करणाऱ्यांमुळे प्रवाशांना इजा होत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून लोहमार्गालगतच्या परिसरामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पण, दगडफेकीचे सत्र सुरूच असून दगडफेकूंना रोखायचे तरी कसे? असा प्रश्‍न रेल्वे पोलीस व प्रशासनाला पडला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक रहिवाशांकडून म्हैसूर ते अजमेर एक्‍स्प्रेस, बेंगळुरू ते गांधीधाम एक्‍स्प्रेम, तिरुनवेल्ली ते दादर एक्‍स्प्रेस आदी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांसह लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट दुखापत झाली. यासह रेल्वे गाड्यांचे देखील नुकसान झाले.

या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर विशेष प्रयत्न करण्यात येत असून रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांच्या पथकांच्या मदतीने नियंत्रण आणण्यात आहे आहे. त्याचबरोबर लोहमार्गालगतच्या वस्त्यांमध्ये जनजागृती आणि समुपदेशन करण्यात आहे. दगडफेकीसह लोहमार्गावर कोणतीही वस्तू न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिकांकडून करण्यात येणाऱ्या या गोष्टींमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यासह मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी शक्‍यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारच्या प्रवृत्तीने धोकादायक गोष्टी घडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने दिला आहे. त्याचबरोबर दगडफेकीची घटना दिसल्यास नागरिकांनी स्थानिक पोलिसांनी कळवावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

पुणे विभागातील प्रमुख घटना
लोणंद-नीरा स्थानकांदरम्यान अज्ञात व्यक्तींकडून म्हैसूर ते अजमेर एक्‍स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये इंजिनच्या काचा फुटल्याने गाडीचा लोको पायलट गंभीर जखमी झाला होता.
आळंदी – फुरसुंगी स्थानकांदरम्यान बेंगळुरू ते गांधीधाम एक्‍स्प्रेसवर झालेल्या दगडफेकीमध्ये सहायक लोको पायलटच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती.
सासवड- घोरपडी स्थानकांदरम्यान तिरुनवेल्ली-दादर एक्‍स्प्रेसवर अज्ञात व्यक्तींकडून इंजिन ड्रायव्हर आणि डब्यांवर दगडफेक करण्यात आली होती.
कराड स्थानकावर तीन मुलांनी महाराष्ट्र एक्‍स्प्रेसच्या वातानुकूलित कोचवर दगडफेक केली. त्यांच्यावर सातारा बाल न्यायालयामध्ये खटला सुरू आहे.

…तर कारावासाची शिक्षा अटळ
दगडफेक करताना नागरिक आढळून आल्यास रेल्वे नियम 152 नुसार आजीवन किंवा 10 वर्षांचा कारावास होऊ शकतो. त्याचबरोबर रेल्वे हद्दीच्या आत अनधिकृत घटना घडल्यास नियम 147 नुसार 6 महिन्यांचा कारावास आणि 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)