पिंगोरीतील डोंगर पेटला

वनाला लागलेल्या भीषण आगीत सुमारे 300 एकरावरील वनसंपदा नष्ट

नीरा- पिंगोरी येथील खासगी वनजमिनीला लागलेल्या आगीत तीनशे एकरावरील वनजमिनीतील वनसंपदा जाळून नष्ट झाली. वनविभागाने नऊ तास सतत प्रयत्न करून वनवा विझवला. या आगीत सुमारे 300 एकरावरील वनसंपदा नष्ट झाली आहे.

पिंगोरीच्या हद्दीत कडेपठारच्या पायथ्याला रविवारी (दि.14) अज्ञात इसमाने खासगी डोंगरावरील गवत, पाचोळ्यास आग लावली. त्याच वेळी वनविभागाचे अधिकारी सर्वे करीत होते, त्यांना कडेपठारच्या बाजूला मोठा धूर निघत असल्याचे दिसल्याने पोलीस पाटील राहुल शिंदे, अधिकारी व ग्रामस्थ त्याठीकाणी गेले. त्यांनी पाहणी केली असता, डोंगराला मोठी आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी कोणताही विलंब न करता सर्वांनी आग विझविण्यास सुरवात केली. मात्र, आग भडकत गेल्याने वनविभागाकडील आग विझविण्याच्या यंत्रणेला पाचारण करण्यात आले, तसेच कर्मचाऱ्यांची वाढीव कुमक मागविण्यात आली. पिंगोरी येथील बाबा शिंदे, अमोल शिंदे, बाळासाहेब शिंदे, सागर यादव, तुषार शिंदे तसेच स्थानिक नागरिकांनी मदत घेण्यात आली. जवळपास नऊ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्‍यात आली.

पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वनजमिन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे.त्याच बरोबर शासकीय वनजमीन देखील मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्यावतीने यामध्ये मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात आले आहे. मात्र, अशा प्रकारच्या आगीमुळे या जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासकीय पातळीवरून वन वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असले तरी लोकांकडून डोंगरांना आग लावण्याच्या अनेक घटना घडत असून यातून वनसंपदा नष्ट होत आहे.

  • वनविभागाने केले जीवाचे रान…
    पिंगोरीतील हद्दीत लागलेल्या आगीमुळे जेजुरी मधील शासकीय वनीकरण केलेल्या जमिनीस मोठा धोका निर्माण झाला होता. जेजुरीच्या बाजूने शासनाने नुकतेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. ही आग तिथे गेली असती तर लाखो रुपये खर्चून करण्यात आलेले वनीकरण नष्ट झाले असते. मात्र, वनपाल वाय.जे.पाचर्णे व वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, कर्मचारी बाळू चव्हाण, महादेव थोरवे यांनी मोठे प्रयत्न करीत वनीकरणात जाणारी आग थोपवून धरली, त्यामुळे मोठे नुकसान टळले.
  • शासनस्तरावर वन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. मात्र, काही लोकांच्या चुकांमुळे त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. काही लोक बांधावरील गवत काढण्याऐवजी ते पेटवतात आणि त्यामधून, असे वनवे लागतात. लोकांनीही आता सामाजिक भान ठेवायला हवे. अन्यथा, कितीही प्रयत्न केले तरी वनसंपदा वाढणार नाही. याची मोठी किंमत पुढे जाऊन मोजावी लागेल. यापुढे असे वणवे लागण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
    – वाय.जे.पाचरणे, वनरक्षक, पुरंदर
  • डोंगरावरील किंवा बांधांवरील गवताला आग लावू नका, असे याभागातील लोकांना वारंवार बजावले आहे. वनसंपदा व तिचे महत्त्व काय आहे? याबाबत गावातील तरुण लोकांमध्ये जागृतही करीत आहे. मात्र, तरीही लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यापुढे लोकांनी काळजी घ्यायला हवी.
    – राहुल शिंदे, पोलीस पाटील, पिंगोरी
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)