दौंड रेल्वे प्रशासनाकडून होणार होती कारवाई
दौंड- येथील ग्रामदैवत असलेल्या तुकाई देवीचे मंदिर काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आचानक आल्याने भाविकांत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट पसरली. सोमवारी (दि. 3) सायंकाळी 6 वाजता रेल्वे सुरक्षा दलाचे पुरुष आणि महिला असे शंभराच्यावर पोलीस, सशस्त्र जवान तुकाई देवी मंदिराजवळ मंदिर काढण्याच्या हेतूने आले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना भ्रमणध्वनीव्दारे संपर्क केला असता त्यांनी तत्काळ रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि ही कारवाई तुर्तास तरी थांबली. सध्या जरी ही कारवाई थांबली असली तरी भविष्यात देखील अशी कारवाई कधी न कधी होणारच असल्याने या ग्रामदैवत मंदिराबाबत स्थानिक राजकारण्यांनी हे मंदिर सुरक्षित राहण्यासाठी रेल्वे खात्याकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत येथील भाविक आणि नागरिक व्यक्त करीत आहेत.
दौंडमधील तुकाई देवीचे मंदिर साधारणतः पन्नास वर्षांपूर्वीचे असल्याचे परिसरातील ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. या मंदिराशेजारी म्हसोबा मंदिर ही असून, तेही मंदिर जुने आहे. नवरात्रौत्सवात शहरातील भाविक मोठ्या प्रमाणावर या मंदिरात दर्शनासाठी येत असतात, तसेच दसऱ्याच्या दिवशीही सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम झाल्यानंतर शहरातील नागरिक तुकाई देवीच्या दर्शनाला येत असतात असे हे दौंडमधील तुकाई देवीचे मंदिर आहे, त्यामुळे हे मंदिर रेल्वे प्रशासनाकडून वाचावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.