वाघोली ग्रामपंचायतीची कारवाई ; रस्ता खुला
वाघोली- वाघेश्वर मंदिर ते खांदवेनगरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये काढण्यात आली. रस्त्याच्या कडेला असणारे शेड, टपऱ्या, दुकानांचे बोर्ड जेसीबीच्या मदतीने काढल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजू मोकळी झाली आहे. या कारवाईमुळे नागरिक आणि वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने दि. 25 मे रोजी केसनंद फाटा, आव्हाळवाडी फाटा, बायफ रोड येथील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली होती. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या मासिक सभेमध्ये वाघेश्वर मंदिर ते खांदवेनगरपर्यंत अतिक्रमणे काढण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी (दि. 6) रोजी वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे ग्रामपंचायत कर्मचारी व जेसीबीच्या मदतीने काढण्यात आली. खांदवेनगर येथे करण्यात आलेल्या कारवाईनंतर रस्त्याने मोकळा श्वास घेतला. दिवसभर ग्रामपंचायतीने कारवाई केल्यानंतर वाहतुकीला मोठया प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अनेकांनी अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली. काही नागरिकांनी पक्के बांधकाम स्वतःहून काढणार असल्याचे कळविले.
यावेळी सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच मारुती गाडे, ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे, सुधीर भाडळे, संपत गाडे, तात्या सातव, राजेंद्र खांदवे व ग्रामस्थ उपस्थित होते.