जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त

कायदा सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज; सहा हजार जवान तैनात

सातारा,दि.22 प्रशांत जाधव

सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये सातारा पोलीस दलाच्या साडे तीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यासंह केंद्रीय व राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, गृहरक्षक दलाचे जवान,बाहेरील जिल्ह्यातील कर्मचारी, अधिकारी,राज्य राखीव दल, केंद्रीय दलाच्या जवानांसह सुमारे सहा हजार अधिकारी,कर्मचारी असा तगडा पोलीस बंदोबस्त निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी सज्ज झाला आहे.

सातारा व माढा लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. दरम्यानच्या काळात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडून कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी कंबर कसली आहे. गेली महिना जिल्हाभर या दोन्ही अधिकाऱ्यांनी दौरे करून मतदान प्रक्रिया कशा पध्दतीने शांततेत पार पडेल यासाठी नियोजन करत होते. त्या दरम्यान पोलीस दलाच्या वतीने संवेदनशील, अतिसंवेदनशील गावांची माहिती गोळा करून त्या ठिकाणी शांतता राखण्यासाठी मास्टर प्लॅन आखला होता. त्यानुसारच निवडणुक बंदोबस्ताची सर्वस्वी सुत्रे ही जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे राहणार आहेत.तर दुय्यम बंदोबस्त प्रभारी म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील काम पाहणार आहेत.

या बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील 8 उपविभागीय पोलीस अधिकारी, 19 पोलीस निरीक्षक, 113 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 2 हजार 356 पोलीस कर्मचारी, 900 होमगार्ड तसेच रस्ते सुरक्षा अभियानाचे व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांचे 106 जवान असतील. तर जिल्ह्याबाहेरील 1 अप्पर पोलीस अधिक्षक, 5 उपविभागीय पोलीस अधिकारी, 1 पोलीस निरीक्षक, 62 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 467 पोलीस कर्मचारी, 620 होमगार्डचे जवान असतील. याशिवाय केंद्रीय राखीव (एसआरपीएफ) पोलीस दलाच्या दोन तुकड्या, राज्य राखीव (सीआरपीएफ) पोलीस दलाच्या दोन तुकड्या, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची एक तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना कोणताही शारीरीक त्रास होऊ नये याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी काळजी घेतली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी बंदोबस्तावरील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मच्छरांचा त्रास होऊ नये म्हणून दोन ओडोमास, दोन पेन किलर गोळ्या, 2 ओआरएस पाकीट असलेले मेडीकल किट पोलीस दलाच्या वतीने देण्यात आले. तसेच मसाला पुरी, शेंगदाणा पोळी, एनर्जी ड्रींक यांचा समावेश असलेले फुड पॅकेटचेही वाटप करण्यात आले आहे.

एसपी,ऍडीशनल एसपींचं भिरकीट
जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत निवडणुका शांततेत पार पाडायचा असा चंग बांधून जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस प्रमुख धीरज पाटील यांनी गेली एक महिना जिल्हाभर भिरकीट सुरू केले होते. निवडणुक काळात गुंड,चोर,मारामाऱ्या करणाऱ्यांना तडीपार केले. त्यानंतर जिल्ह्यातील संवेदनशील गावांची माहिती गोळा करून तिथे पोलीस संचलन करून लोकांना विश्‍वास दिला. त्यानंतर बंदोबस्ताचा मास्टर प्लॅन तयार करून सुमारे सहा हजार कर्मचारी, अधिकारी असा तगडा पोलीस बंदोबस्त निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी तैनात केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)