मॉलमधून ब्रॅंडेड घड्याळे चोरणाऱ्या मुख्य आरोपीस दिल्लीतून अटक
पुणे, दि.5- सेल्समनची दिशाभूल करुन मॉलमधील एका शॉपीतून 5 लाख 5 हजार रुपये िंकमतीची चार रॅडो कंपनीची ब्रॅंडेड घड्याळे चोरणाऱ्या मुख्य गुन्हेगारास गुन्हे शाखेने दिल्ली येथून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीची घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.
विवेक मनवरसिंग रावत(33,रा.फरिदाबाद , हरियाणा ) असे अटक आरोपीचे नाव आहे. या अगोदर त्याचे साथीदार आशिष कुशल विस्त, आकाश बालकिशन ढाका आणि रविंद्ररसिंग अमरजितसिंह (सर्व रा. दिल्ली ) यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सुशांत सुभाष घोरपडे (रा. सिंहगड रस्ता ) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमध्ये ईथॉस वॉच शॉपी आहे. 8 ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खरेदीच्या बहाण्याने दोनजण शॉपीमध्ये आले होते. त्यांनी सेल्समनकडून रॅडो कंपनीची ब्रॅंडेड घड्याळे पाहण्यासाठी हातात घेतली. त्यानंतर भामट्यांनी सेल्समनचे लक्ष विचलित करुन शॉपीतून 5 लाख 5 हजारांची चार घड्याळे चोरुन पळ काढला होता. या घटनेचा तपास करताना आरोपी दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आशिष, आकाश आणि रविंदरसिंगला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शॉपीतून चार घड्याळे चोरल्याची कबुली दिली. त्यातील तीन घड्याळे घेऊन विवेक हरियाणाला पळाला होता. त्याचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार , पोलीस कर्मचारी गणेश काळे, अशोक शेलार, सागर घोरपडे, सचिन ढवळे, भालचंद्र बोरकर, सुहास कदम यांच्या पथकाने केली.
*विमानाने येऊन करायचे मॉलमध्ये ब्रॅंडेड वस्तूंच्या चोऱ्या *
आरोपींना दिल्लीमध्ये हॅंण्डसम गॅंग म्हणून ओळखले जाते. हे आरोपी देशातील मोठ्या शहरांमध्ये विमानाने जातात. यानंतर तेथील मॉलमध्ये खरेदीच्या बहाण्याने ब्रॅंडेड वस्तू चोरतात. या वस्तू काही काळ ते स्वत:साठी वापरतात. यानंतर त्यांची विक्री करतात. ब्रॅंडेड वस्तू वापरण्याचा आणी उच्चभ्रू जीवनशैलीचा त्यांना शौख आहे. यातील बहुतेकांनी दहावीनंतर शिक्षण घेतलेले नाही. मात्र त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.