पुणे : कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्याने नाराज होऊन चंद्रकांत पाटील यांना असणारा ब्राह्मण महासंघाचा विरोध अखेर मावळला आहे. महासंघाने आज एक पत्रक काढून पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची डोकेदुखीवर काही प्रमाणात उतारा मिळाला आहे.
महासंघाने यापूर्वी पाटील यांना विरोध करणार असल्याचे जाहीर केला होता, मात्र महासंघाची समजूत काढण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्या उमेदवारीला चंद्रकांत पाटील यांना अनेक कारणामुळे विरोध होत आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीसह विरोधकांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देत त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला
संपूर्ण राज्यात लक्षवेधी असलेल्या पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे असा रंगतदार सामना रंगणार आहे . त्यापार्श्वभूमीवर ब्राम्हण महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक पार पडली. त्यात ब्राह्मण समाजाच्या समस्या आणि मागण्या यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर महासंघाने एका पत्रकाद्वारे पाठिंब्याची घोषणा केली.
यावेळी ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश अध्यक्ष मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कि, ब्राम्हण महासंघाचा माझ्या उमेदवारीला विरोध नाही, तर त्यांच्या काही मागण्या आहेत, ज्या सरकारने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा रोष सरकारवर आहे. पण सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्यांच्या मागण्यांवर निर्णय होत नाही. आचारसंहिता समाप्त होताच आम्ही त्यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार करू. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचा उमेदवार माघार घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.