पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची कामे मिळविण्यासाठी बोगस एफडीआर (फिक्स डिपॉझिट रिसिट) सादर करून कामे घेणाऱ्या पाच ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोगस एफडीआर सादर करून पाच ठेकेदारांनी तब्बल शहरातील 52 कामांचे ठेके घेतले होते. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागातून स्थापत्य विषयक कामाच्या निविदा काढल्या जातात. त्यात लघुत्तम दराने जो ठेकेदार निविदा सादर करेल त्या ठेकेदाराला ती कामे दिली जातात. दरम्यान, पालिकेची कामे घेताना संबंधित ठेकेदाराने 15 किंवा त्यापेक्षा कमी टक्के दराने निविदा भरल्यास त्या ठेकेदाराला एफडीआर द्यावी लागते. पालिकेच्या अनेक कामांमध्ये ठेकेदारांनी बोगस एफडीआर पालिकेला सादर करून कामे मिळवली असल्याची बाब पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी करून पाच ठेकेदारांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले होते. मात्र तक्रारदार व्यक्ती दिली नसल्याने गुन्हे दाखल करण्यास विलंब लागला.
फसवणुकीचा पहिला गुन्हा मे. पाटील ऍण्ड असोसिएटचे मालक सूजित सूर्यकांत पाटील (वय 26, रा. भोसरी) याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. पाटील ऍण्ड असोसिएटने 29 जानेवारी 2019 ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत पालिकेची पाच स्थापत्य विषयक कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बॅंक-आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.
फसवणुकीचा दुसरा गुन्हा मे. कृती कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल हनुमंत कुऱ्हाडे (वय 29, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. कृती कन्स्ट्रक्शनने 24 डिसेंबर 2019 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक चार कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बॅंक, आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.
फसवणुकीचा तिसरा गुन्हा मे. एस. बी. सवईचे मालक संजय बबन सवई (रा. चिंचवड) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. एस. बी. सवईने 9 ऑक्टोबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक सात कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बॅंक, आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.
फसवणुकीचा चौथा गुन्हा मे. वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे (वय 47, रा. भोसरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. वैदेही कन्स्ट्रक्शनने 9 ऑक्टोबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक 12 कामे घेतली होती. त्यात त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र राजगुरू नगर शाखा, पंजाब नॅशनल बॅंक नाना पेठ पुणे यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बॅंकांनी दिला नसल्याचे आढळून आले आहे.
फसवणुकीचा पाचवा गुन्हा मे. डी. डी. कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवानी (वय 28, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. डी. डी. कन्स्ट्रक्शनने 27 जून 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक 24 कामे घेतली होती. त्यात त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक नाना पेठ पुणे शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बॅंकेने दिला नसल्याचे आढळून आले आहे.
ठेकेदारांनी बोगस एफडीआर सादर करून पालिकेची कामे मिळवली असल्याने त्यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करत फौजदारी कारवाई कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पोलिसांना दिले होते. त्यानुसार पाच ठेकेदारांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तांकडून झाडाझडती
महापालिकेने पोलिसांना पत्र देऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून गुन्हा दाखल होत नव्हता. याबाबत पोलीस आयुक्तांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हालचाली करीत गुन्हा दाखल केला.