- पोल्ट्री व्यावसायिकाच्या फार्ममधील साडेतीन हजार कोंबड्या दगावल्या
- आणखी 32 हजार सातशे पक्षांची विल्हेवाट लावणार – डॉ. देशपांडे
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात “बर्ड फ्ल्यू’ आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अंदाजे साडेतीन हजार पक्षांची विल्हेवाट लावण्यात आली असून, आणखी 32 हजार 700 पक्षी विल्हेवाट लावण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका पशुधन अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे यांनी दिली. तसेच 10 किलोमीटरच्या परिघात चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली असल्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
साळुंब्रे येथील पोल्ट्री व्यावसायिकाच्या फार्ममधील कोंबड्या मृत पावल्याची माहिती तालुका पशुधन अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. आता बर्ड फ्ल्यू आजाराची खबरदारी म्हणून कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांनी पोल्ट्री फार्मला भेट देत पाहणी केली.
पोल्ट्री फार्मवरील पंचनामा केला, “जेसीबी’च्या साहाय्याने खड्डे घेऊन अंदाजे 3500 पक्षांची विल्हेवाट लावण्यात आली, तसेच आजूबाजूच्या 1 किलोमीटर परिसरातील सुमारे 32 हजार 700 पक्षांची विल्हेवाट देखील लावण्यात येणार असल्याची माहिती तालुका पशुधन अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे यांनी दिली.
या वेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, मावळ गटविकास अधिकारी सुधीर भागवत, आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे, डॉ. अनिल परंडवाल, डॉ. राक्षे, तलाठी दिलीप राठोड, माजी उपसरपंच विशाल वाहिले, पै. सुनील दंडेल, ऍड. अक्षय रौधळ आदी अधिकारी, पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पोल्ट्री व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई प्रतिकोंबडी दर अतिशय कमी मिळत असून, त्यात वाढीव रक्कम देण्यात यावी, अशी विनंती देखील केल्याचे सभापती यांनी या वेळी पोल्ट्री व्यावसायिक व शेतकऱ्यांना सांगितले. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना घाबरून न जाता शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वास पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
10 किलोमीटरच्या परिघात मांस विक्रीवर बंदी
सभापती बाबूराव वायकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांची त्वरित विल्हेवाट लावा तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची प्राथमिक स्वरूपाची आरोग्य तपासणी करून घेण्याच्या व पंचनामा केलेल्या ठिकाणापासून 10 किलोमीटर परिसरामध्ये कोंबड्यांचे मांस विक्री तसेच वाहतुकीवर कडक निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.