वाशिंग्टन – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 11.5 टक्के होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजेच हा विकासदर चीन आणि इतर मोठ्या देशांच्या अंदाजित विकासदराहून अधिक आहे.
सर्वाधिक विकासदर असणाऱ्या मोठ्या देशांच्या यादीमध्ये भारत अव्वल स्थानी असेल असे भाकितही आयएमएफने वर्तवले आहे. हा अहवाल मोदी सरकारसाठी दिलासा देणारा असल्याचे मत आर्थिक जाणकार व्यक्त करतात.
आयएमएफने जारी केलेल्या वर्ल्ड इकनॉमिक आउटलूक म्हणजेच जागतिक आर्थिक विकासाचा आढावा घेणाऱ्या अहवालामध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सुधारण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सन 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करोना लॉकडाउनमुळे बसलेल्या फटक्यामुळे विक्रमी घसरण झाली होती.
चिनी अर्थव्यवस्था 8.1 टक्क्यांनी आर्थिक विकास करेल तर दुसरीकडे स्पेन 5.9 आणि फ्रान्सचा आर्थिक विकासदर 5.5 टक्के इतका असेल अशा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे.
भारत हा वेगाने विकास करत असणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. या विकासदर वृद्धीसाठी करोनाची लस अप्रत्यक्षपणे कारणीभूत असल्याचे संकेत आयएमएफने आफल्या अहवालात दिले आहेत.
मागील तिहामीमध्ये काही देशांना करोना लस बनवण्यात यश मिळाले असून इतर काही देशांनाही करोना लसीकरणाला प्रारंभ केला आहे. आयएमएफने 2021 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 5.5 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑक्टोबर आयएमएफने हाच विकास दर 5.2 टक्के असेल असं म्हटले होते.
आयएमएफने 2021 च्या सुरुवातीलाच अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर पहायला मिळू शकेल असा आमचा अंदाज असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. अमेरिका आणि जपानसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2020 च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये आर्थिक विकासदर उंचावल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
म्हणूनच आता इतर देशांमध्येही करोनामुळे आलेली आर्थिक मरगळ दूर करुन अर्थव्यवस्था आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही सर्वाधिक लक्ष हे भारतीय अर्थव्यवस्थेकडे असणार आहे, हे आयएमएफच्या अहवालावरुन स्पष्ट होत आहे.