बारामती – करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात मास्क व वाहन तपासणीदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीने होमगार्डच्या पायावरून गाडी घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरूवारी (दि. 5) दुपारी बाराच्या दरम्यान पेन्सील चौकात घडला. नगरसेविकेच्या पतीने धक्काबुकी करीत शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत पोलिस कर्मचाऱ्यांनी नगरसेविकेच्या पतीची धुलाई केली. या घटनेची शहरात दिवसभर चर्चा रंगली होती. यावेळी ठाण्यात पोलीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता, याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या
माहितीनुसार, याप्रकरणी पांडुरंग नारायण चौधर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी होमगार्ड संदीप सुरेश भोसले हे पेन्सिल चौकात बेशिस्त वाहनांवर कारवाई करीत होते. नगरसेविका पतीसह चारचाकी वाहनातून येत होत्या. त्यावेळी वाहन होमगार्डच्या पायावरुन गेले. यावेळी पोलिसांनी नगरसेविकेच्या पतीला गाडी थांबविण्यासाठी विनंती केली. मात्र, तरी देखील गाडी थांबवली नाही. पोलिसांनी धावत जाऊन गाडी रोखली. चौधर याला गाडीच्या बाहेर उतरण्यास सांगितले. मात्र, तो गाडीच्या बाहेर उतरायला तयार नव्हता. यावेळी अधिकारी तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीची चावी काढून घेतली. यावेळी चौधर याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर पोलिसांनी चौधर यास वर्दीचा हिसका दाखविला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ही घटना समाजातच नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर पोलीस ठाम राहिले. पुढील तपास बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.