राज्यातील महाआघाडी सरकारबद्दल भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले…

पुणे  – “राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही, ती आमची संस्कृती नाही,’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, “महाविकास आघाडीचे सरकार हे चार वर्षे चालणार नाही, त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत. ती आताच उघड करता येणार नाहीत. रडत न बसता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवत आहोत,’ असेही पाटील यांनी सांगितले.

 

विधानभवन येथे पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उमेदवार देशमुख, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, भिमराव तापकीर, माजी आमदार मेधा कुलकर्णी आदींसह भाजपचे नेते उपस्थित होते.

 

पाटील म्हणाले, “मी पुणे पदवीधर मतदारसंघाचा आमदार असताना शासकीय निधीतून अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. पदवीधरांच्या मतदार यादीमध्ये असलेल्या अनेक चुका मी दुरुस्त करुन घेतल्या. त्यासाठी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पदवीधर व शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी भाजपचे उमेदवार प्रयत्न करतील.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.