पुणे – प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा दिला आहे. त्याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. त्यानंतर आता संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय आणि निगडी येथील फार्मसी कॉलेजचा स्वायत्ततेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य आर. एस. झुंजारराव, संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. “यूजीसी’चे मंगळवारी मॉडर्न महाविद्यालयास स्वायत्त मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले. स्वायत्ततेसाठी संस्थेने गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. याबाबतचा प्रस्ताव 24 मार्च 2019 रोजी “यूजीसी’कडे सादर केला होता. अवघ्या दीड महिन्यांतच स्वायत्ततेचे पत्र प्राप्त झाल्याचे डॉ. एकबोटे यांनी सांगितले.
आता “यूजीसी’ने स्वायत्ततेचे निकष स्पष्ट केले असून, त्यात आता कोणतीही संदिग्धता राहिली नाही. सातव्या आयोगानुसार शिक्षकांचे वेतन कपात होणार नसल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्याचा विचार करून सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन स्वायत्ततेसाठी संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे, असे डॉ. एकबोटे यांनी नमूद केले.
स्वायत्त मिळाली असली, तरी मॉडर्न महाविद्यालयाचे विद्यापीठांशी संलग्न कायम राहील. तसेच आरक्षण पूर्वीप्रमाणे राहतील. अभ्यासक्रमाची शुल्करचना करताना अवास्तव वाढ केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवर पुणे विद्यापीठ आणि मॉडर्न महाविद्यालय या दोन्हीचा उल्लेख असेल. स्वायत्त दर्जा मिळाल्याने सर्व क्षेत्रात सुलभता येणार असून, त्यानुसार महाविद्यालयाची गुणवत्ता वाढीसाठी संस्था कटिबद्ध आहे.
– डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष : प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी
स्वायत्त दर्जा मिळाल्याचा फायदा काय?
स्वायत्त दर्जा मिळाल्याने त्याबाबतचे विद्यार्थी केंद्रित व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. त्यानुसार नवनवीन अभ्यासक्रम, ऑनलाइन अभ्यासक्रम, सुसज्ज पायाभूत सुविधा, स्मार्ट क्लासरूम, अद्ययावत ग्रंथालय, प्रयोगशाळेचे उन्नतीकरण, ऑनलाइन परीक्षा पद्धत, इंड्रस्टीचा अभ्यासक्रमात समावेश आणि देशी-परदेशी विद्यापीठांशी सहकार्याने कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नवीन पदविका अभ्यासक्रम येत्या जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्राचार्य झुंजारराव यांनी स्पष्ट केले.