देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्ड : वर्षाला साडेअकरा कोटी रुपये मिळणार
खासगीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार ?
बोर्ड प्रशासनाने यापूर्वी वसुलीसाठी केलेले खासगीकरणाचे प्रयोग यशस्वी न झाल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. वसुलीचा ठेका सन 2013 पेक्षा कमी किंमतीमध्ये दिला असल्याने या ठेक्यात गोलमाल आहे. तर खासगीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार का? अशा चर्चेला शहरवासीयांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
देहुरोड – देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या वाहनांच्या प्रवेश शुल्क वसुलीचा खासगी कंपनीला ठेका दिला. मंगळवारपासून शुल्क वसुली करण्यात येत आहे. या ठेकेदाराकडून बोर्डाला वर्षाला 11 कोटी 50 लाख 550 रुपये उत्पन्न मिळणार आहे. याशिवाय शुल्क वसुलीसाठी असलेले कर्मचारी बोर्डाची अन्य कामे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची जकात वसुली बंद झाल्यानंतर वाहन प्रवेश शुल्क सुरू केले. वाहन प्रवेश शुल्कचा ठेका देण्यासाठी बोर्डाने निविदा मागविल्या. त्यामध्ये आलेल्या निविदांतील तीन ठेकेदारांपैकी सोलापूर कन्स्ट्रक्शन व फॅब्रिकेटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांची एका वर्षापोटी 11 कोटी 50 लाख 550 रुपयांची निविदा मान्य करून वसुलीचे काम देण्यात आले आहे. मात्र वसुली ठेक्याची राखीव किंमत बोर्डाकडून सांगण्यात आली नाही. ठेकेदाराकडून एक कोटी 72 लाख रुपयांची सुरक्षा रक्कम घेण्यात आली असून, वसुलीपोटी मिळणाऱ्या रकमेचे त्यांच्याकडून आगाऊ तारखांचे धनादेश घेण्यात आले आहेत. दरम्यान वसुलीचे खासगीकरण केल्याने बोर्डाचा कर्मचाऱ्यांवरील सुमारे एक कोटी 75 लाख रुपयांचा खर्च वाचणार असल्याचे सांगण्यात आले आहे.