ओतूर -अहमदनगर-कल्याण महामार्गावर उदापूरजवळ भरघाव येणाऱ्या ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात मुथाळणे (ता. जुन्नर) येथील आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 15) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रदीप रामू गभाले (वय 28, रा. मुथाळणे, ता. जुन्नर) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भवारी करीत आहेत. या अपघातानंतर आदिवासी नेते जि. प. सदस्य देवराम लांडे, अंकुश आमले यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलीस ठाण्यात जाऊन तत्काळ कडक कारवाईची मागणी केली.