दहा लाखाची रोकड लूटणाऱ्यास वाहतूक पोलीस व बीट मार्शलने पकडले
पुणे,दि.27-बॅंकेची डेली कलेक्शनची दहा लाखाची रोकड घेऊन पळून जाणाऱ्या तीघांना वाहतूक पोलीस, बीट मार्शल यांनी पाठलाग करुन पकडले. ही घटना साडेचारच्या सुमारास संगम ब्रीज येथे घडली.
ओमकार उत्तेकर, महेश पाटोळे, तेजस पाटोळे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभिनव खेसे याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खेसे हे ब्रिंग इंडिया फायनांन्स कंपनीच्या डेली कलेक्शनचे काम करतात. ते व्यापारी व फायनांन्स कंपनीच्या इतर ग्राहकांचे हप्त्याचे पैसे गोळा करुन कंपनीत देण्याचे काम करतात. यानंतर कंपनी हे पैसे बॅंकेत भरते. दुपारी साडेचारच्या सुमारास ते दुचाकीवरुन जमलेली दहा लाखाची रोकड घेऊन चालले होते. त्यांच्यावर पाळत ठेऊन तीघा आरोपींनी त्यांना गाठत दमदाटी करुन पैशाची बॅग हिसकावली. ही बॅग घेऊन पळत जात असताना खेसे यांनी आरडा ओरडा केला. हे ऐकून चौकातील वाहतूक पोलीस, जवळून जाणारे बीट मार्शल आणी इतरांनी आरोपींच्या दिशेने धाव घेत त्यांना जेरबंद केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोकड लूटण्याची मागील काही महिण्यातील ही तीसरी घटना आहे.