प्रेस क्लब व भैरवनाथ आय हॉस्पिटलचे नेत्रचिकित्सा शिबीर
नगर (प्रतिनिधी) -उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. विशेषत: महिलांनी डोळ्यांच्या किरकोळ आजाराकडेही दुर्लक्ष करू नये, असे मत भैरवनाथ आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. रावसाहेब बोरुडे यांनी व्यक्त केले.
जागतिक महिलादिनानिमित्त अहमदनगर प्रेस क्लब व भैरवनाथ आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चौपाटी कारंजाजवळील हॉस्पिटलमध्ये पत्रकार, पत्रकारेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सारिका बोरुडे तसेच उपस्थित पत्रकारांच्या पत्नी भारती झोटींग, सुरेखा गारडे, मुक्ता वाघमोडे, निलम खराडे, दिप्ती जाधव आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग कुलकर्णी, दिलीप वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बोरुडे दाम्पत्याचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. सारिका बोरुडे म्हणाल्या, डोळ्यांना चष्मा लागत असला, तरी बहुतेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नंबर वाढत जातो. तसेच डोळ्याखालील काळे वर्तुळ, डोळ्यातील कोरडेपणा आदींकडे महिलांनी आवर्जुन लक्ष द्यायला हवे. या शिबिरात 60 जणांची नेत्रतपासणी करून त्यांना औषध वाटप करण्यात आले.