क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांची माहिती; राष्ट्रवादीच्या तक्रारीची दखल
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नुकत्याच राबविण्यात आलेल्या महापौर चषक व टीन-20 स्पर्धांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तक्रारी केल्याचे निदर्शनास आले आहे. या तक्रारींची दखल घेऊन माहिती व अहवाल मागितला जाईल, तसेच तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी तटकरे शहरात आल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. या विषयावर बोलताना त्या म्हणाले. महापौर चषक व टीन 20 स्पर्धेतील भ्रष्टाचाराबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्याचे निदर्शनास आले आहे. या तक्रारींबाबत पक्षातील लोकांकडूनही समजले आहे. या स्पर्धांबाबत संपूर्ण माहिती मागविली जाईल व सखोल चौकशी करून अहवाल मागविला जाईल.
कोणत्याही स्पर्धा आयोजित करताना आयोजकांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. आयोजकांनी या स्पर्धा पार पाडताना भ्रष्टाचार विरहित व निष्पक्षपणे धोरण राबविले पाहिले. खेळाप्रति सर्वांचे प्रेम असते, आयोजनात चुका होणार नाहीत, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक असते. मात्र भ्रष्टाचार झाला असल्यास त्याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
“दिशा’ कायद्याची लवकरच अंमलबजावणी
अतिशय प्रतिकूल परस्थितीतून राज्य जात आहे. आर्थिक मंदी, कोरोना व्हायरस, महिला सुरक्षेचा प्रश्न, अवकाळी पावसासह शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न, अशा परिस्थितीत अर्थमंत्री अजितदादांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केला. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा दिला. महिला अत्याचाराबाबत दिशा कायद्याची लवकरच अंमलबजावणी होईल. त्यामुळे सर्व घटकांना सामावून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.