दोघे फरार : बारामती पोलिसांची लोणंदमध्ये कारवाई
बारामती- बारामती शहर पोलिसांनी शनिवारी (दि. 11) रात्री गाढवांची तस्करी करणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीला रंगेहात पकडले असून दोघे फरार झालेले आहेत. हे तिघे जण आंध्र प्रदेशातील असून पकडलेल्या आरोपीची भाषा पोलिसांना येत नसल्याने व आरोपीला हिंदी समजत नसल्याने रविवारी (दि. 12) रात्रीपर्यंत गुन्हा नोंदवायचे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकारामुळे गाढवाची तस्करी करणारी टोळी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबतची माहिती अशी की, एका आयशर ट्रकमध्ये गाढवे भरून नेली जात होती. ही माहिती पोलिसांना समजताच बारामती शहर पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग करून त्याला सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे पकडला आहे. त्यावेळी त्या 15 गाढवे आढळून आली. दरम्यान, तिघे आरोपी रात्रीच्या वेळी फिरून गाढवांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांची तस्करी करीत असल्याची तोडकी माहिती पोलिसांना समजली आहे. तर पकडल्या आरोपीची भाषा समजाण्यास अडचण येत असल्याने पोलिसांना तपास करण्यात अडचणी येत आहे. याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शेलार, उपनिरीक्षक सतीश अस्वर, कॉन्स्टेबल नितीन जगताप, रुपेश साळुंखे, नूतन जाधव, अजित राऊत, तुषार सानप, पोपट नाळे, तुषार चव्हाण यांनी ही कारवाई केली.