नवी दिल्ली – कौटुंबिक कलहानंतर एका तरुणाने गोळीबार करून पत्नी आणि दोन मेहुण्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर मेहुणीला गोळी लागल्याने जखमी झाली आहे. ही घटना दिल्लीतील नेताजी सुभाष पॅलेस परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी मेहुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव मार्केट, शकूरपूर, नेताजी सुभाष पॅलेस येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने पत्नी आणि मेहुण्यांची गोळ्या झाडून हत्या केली, तर मेहुणीच्या पायाला गोळी लागली. जखमी मेहुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
आरोपी दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करत होता. पत्नीने हा प्रकार भावांना सांगितला असावा. त्यानंतर ते आरोपींची समजूत घालण्यासाठी आले असता हा प्रकार घडला असे नातेवाईकांनी सांगितले आहे.