पुणे – तरुणांना टार्गेट करत शहरातील मोठ्या शैक्षणिक संकुल परिसरात कायद्याचे उल्लंघन करत ई सिगारेट, बेव तंबाखुजन्य फ्लेवरची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करत १० लाख ६७ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी शहरातील विविध भागातून २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
देशभरात ई सिगारेट, बेव विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मात्र काही जणांकडून छुप्या पद्धतीने हा सगळ्या वस्तूंची विक्री करण्यात येते. मागच्या काही दिवसात पुणे पोलिसांकडे या संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सर्व युनिटचे अधिकारी, अंमलदार यांची पथके तयार करून शुक्रवारी (दि. ७) रोजी विशेष अभियान राबवून शहरातील प्रमुख आणि मोठ्या शैक्षणिक संकुल असणाऱ्या १८ ठिकाणी ई सिगारेट, बेव तंबाखुजन्य फ्लेवरची विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी २१ जणांना ताब्यात घेऊन १० लाख ६७ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने अधिनियम २०१८ चे कमल ७(२), २० (२) नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच बेकादेशीरपणे ई सिगारेट, बेव विक्री करणाऱ्यांवर कारवाईत सातत्य ठेऊन समूळ उच्चाटन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.