कलंदर: “आपलाच’ माल पण “ते’ मालामाल…

उत्तम पिंगळे

नमस्कार प्राध्यापक… (असे म्हणून मी विसरभोळ्यांच्या घरात शिरलो.)
विसरभोळे: या… या… बसा. (पंखा मोठा करतात.)
मी: काय गरम होतंय हो. सर्व वातावरण अगदी तापून निघाले आहे.
विसरभोळे: निवडणूक आल्यामुळे प्रचाराने तापून गेले आहे ना?
मी: प्रचाराचं सोडा सर, मी वातावरणातील तापमान म्हणत आहे. किती गरम होत आहे. यावेळी उन्हाळा आणखी कडक असणार असा अंदाज आहे.

विसरभोळे; मी ही तसेच ऐकले आहे. या उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी जो तो आपापल्या परीने तयारी करत आहे. मातीचे माठ सर्वत्र दिसू लागले आहेत तसेच नारळपाणी, कलिंगड, सरबत यांचे ठेले सुरू होत आहेत.
मी: होय आणि मोठमोठ्या शीतपेयांच्या कंपन्या त्यांच्या कार्बोनेटेड व साध्या शीतपेयांच्या जाहिरातींसाठी पुढे सरसावल्या आहेत.
विसरभोळे: पण तुम्हाला माहीत आहे का की, कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्‍स्‌ आरोग्यास अपायकारक असून बहुतेक सॉफ्ट ड्रिंक्‍समध्ये साखर जास्त असते.
मी: होय, पण आपण पाहातच आहोत की, यंग जनरेशन जंकफूड आणि या हानिकारक सॉफ्ट ड्रिंक्‍स यांच्या अधीन होत चालली आहे.
विसरभोळे: आहो, सर्वात मोठा फायद्याचा धंदा आहे. यामध्ये या कंपन्यांच्या मागे त्यांच्या परदेशी कंपन्यांचे भक्‍कम पाठबळ असते.
मी: या सर्वांवर काही पर्याय आहे की नाही?
विसरभोळे: प्रथमतः एक लक्षात घ्या की, आजकाल भारतातील फक्‍त कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्‍सची बाजारपेठ जवळजवळ 25 हजार कोटी रुपयांची आहे आणि परदेशी कंपन्यांनी ती बळकावलेली आहे. त्यांच्या प्रचंड जाहिरात खर्चामुळे दुसऱ्या कोणाला येथे येऊ देत नाहीत. एक साधी तीनशे एमएलची बाटली जी साधारण 10 ते 12 रुपयांना पडते ती निर्माण करण्याकरिता दीड रुपयापर्यंत जास्तीत जास्त खर्च होतो. अशा प्रचंड प्रमाणात नफ्याचा मोठा भाग परदेशी कंपन्यांनाच मिळतो. म्हणजे कच्चामाल व निर्मिती आपल्याकडेच व नफा मात्र परदेशी कंपन्यांकडेच. थोडक्‍यात, ही व्यापारी गुलामगिरीच झाली.
मी: मग यावर काही उपाय आहे की नाही?
विसरभोळे: सर्वच समस्यांवर उपाय हा असतोच पण ती सुटण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न व्हायला हवेत. तरुण वर्गाला या पेयांच्या दुष्परिणामाबरोबरच कोणकोणते स्वदेशी चांगले पर्याय ठेवता येतील ते पाहणे आवश्‍यक आहे. म्हणजे बघा जसे पन्हे, जलजिरा, लस्सी, ताक, लिंबूसरबत, इतर फळांची सरबते तसेच कोकम सरबत. आकर्षक पॅकिंग जे तरुण वर्गाला आकर्षित करू शकेल, असा प्रयत्न करावयास हवा. आता भारतीय कंपन्यांही तसे करण्याचा प्रयत्न करत आहेत पण अजून हवे तेवढे यश येत नाही. पण एक बातमी आली होती की या परदेशी कंपन्याच आता पन्हे, जलजिरा बनवणार आहेत. त्यांच्याकडे वितरकांचे प्रचंड जाळे आहे. त्यामुळे ते सहज या मार्केटमध्ये घुसू शकतात. अशी पेये आरोग्यास हानिकारक नाहित पण पुन्हा नफा मूळ परदेशी कंपनीत जाणार आहे.
मी: मग आपल्या कंपन्यांनीही पुढाकार घेतला पाहिजे. जेणेकरून त्यांचा व्यवसायही वाढेल व आरोग्यदायी उष्मानिवारक शीतपेये मिळतील.
विसरभोळे: मोठ्या परदेशी कंपन्यांशी लढाई करणे सोपे नाही; पण अशक्‍यही नाही. सर्वजण एकत्र आले तरच ते शक्‍य होईल.
परदेशी कार्बोनेटेड शीतपेये येथे
टाकताहेत करून सर्वांचाच घात
स्वदेशी आरोग्यदायी पर्याय द्यावेत
सरबते जलजिरा लस्सी व ताक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.