दैनिक “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग
प्रभात प्रभाव
पुणे – पथदिवे काढल्यानंतर तेथे उघड्यावर ठेवलेल्या वीजवाहिन्या महापालिकेच्या विद्युत विभागाने तातडीने काढल्या आहेत. या बाबतचे वृत दैनिक “प्रभात’ने प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या विद्युत विभागाने ही कारवाई केली असून या वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद असल्याचेही सांगण्यात आले.
सिंहगड रस्ता परिसरात पु.ल. देशपांडे उद्यानालगतच्या पदपथावर पथदिव्यांचे खांब हटविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी चक्क वीजजोड धोकादायकरित्या उघड्यावर सोडण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत गरज नसतानाही मोठ्या प्रमाणात पथदिवे उभारण्यात येत आहेत. सिंहगड रस्त्यावरही रस्त्याच्या दोन्ही बाजूला चांगल्या स्थितीतील पथदिवे असताना ते काढून रस्ता दुभाजकावर नवीन पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे नवीन पथदिवे लावल्यानंतर जुने काढण्याचे काम सुरू आहे. अशाच प्रकारे काही पथदिवे काढल्यानंतर त्या ठिकाणी असलेले विद्युत जोड चक्क उघड्यावर सोडण्यात आले होते.