पिंपरी – दारू पिताना झालेल्या भांडणातून सराईत गुन्हेगाराने बिअरची बाटली फोडून काचेने तरुणाच्या गळ्यावर वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री चिंचवडेनगर, चिंचवड येथे घडली.
अभिजित व्यंकट पवार (वय 22, रा. सायली कॉम्प्लेक्स रोड, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमित लगस व त्याच्या दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. अमर व्यंकट पवार (वय 27) यांनी बुधवारी (दि. 5) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मित्राचा वाढदिवस असल्याने अभिजीत, आरोपी अमित लगस आणि इतर मित्र पार्टी करण्यासाठी चिंचवडेनगर, चिंचवड येथील रानमळा हॉटेलच्या पाठीमागे बसले होते.
त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. चिडलेल्या आरोपी लगस याने बिअरची बाटली फोडून अभिजीत याच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर सर्व आरोपी पळून गेले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ निरीक्षक कृष्णदेव खराडे, निरीक्षक किशोर पाटील घटनास्थळी दाखल झाले. आरोपी लगस याच्यावर खूनी हल्ला आणि दुखापत करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत.