योशिहिदे सुगा जपानचे नवे पंतप्रधान

टोकियो – माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचे जवळचे समजले जाणारे योशिहिदे सुगा यांची जपानच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. आबे यांनी गेल्याच महिन्यात प्रकृती अस्वास्थतेच्या कारणास्तव आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योशिहिदे सुगा यांना पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

शिंझो आबे यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भावी पंतप्रधान निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यात प्रथमपासूनच सुगा यांच्या नावाचीच अधिक चर्चा होती. सुगा हे सध्या आबे यांच्या सरकारमधील मुख्य कॅबिनेट सचिव म्हणून कार्यरत आहेत. लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सत्तारुढ आघाडीच्या बहुमतमुळेच आजच्या पंतप्रधानपदाच्या निवडणूकीमध्ये त्यांच्या नावाची निश्‍चिती मानली जाऊ लागली होती.

सुगा यांनी स्वतःला सुधारणावादी आणि सीमांचे बंधन तोडून धोरणांची अंमलबजावणी करणारा कार्यकर्ता संबोधले आहे. विदेशी पर्यटन उद्योगाला त्यांनी विशेष मदत केली आहे. तसेच सेलफोनचे बिल कमी करण्यात आणि कृषी मालाच्या निर्यातीलाही त्यांनी चालना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.