बारामती -महाराष्ट्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान परिषदेच्या (युजीसी) मान्यताप्राप्त कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्नित बारामतीतील पहिल्या योग महाविद्यालयात यंदाच्या वर्षांपासून योगशास्त्र विषयातील बी. ए. (योग) व एम. ए (योग) हे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन व इन्स्टिट्युट ऑफ रूरल पेडियाट्रिक (बाल कल्याण केंद्र) यांच्या वतीने हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.
निरामय जीवन जगण्यासाठी आजच्या धकाधकीच्या जीवनात योगसाधनेची नितांत आवश्यकता आहे, योगशास्त्राचा उपयोग शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्तरावर आहे, त्यामुळे याचा सर्वांगीण सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, यासाठी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे, अशी माहिती डॉ. अनिल मोकाशी यांनी दिली.
संपूर्ण जग योगशास्त्राकडे चिकित्साशास्त्र म्हणून पाहू लागले आहे. भारतीय संस्कृतीविषयी पाश्चात्त्य देशांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. त्यातील विषय, विज्ञान तत्त्वज्ञान याविषयी त्यांना आवड आहे. त्यामुळेच भारतीय शास्त्रांच्या सांगोपांग माहितीची निकड जगाला भासू लागली आहे. त्यामुळे योग विद्या शास्त्र, वेदशास्त्र, संस्कृत पंडित या अभ्यासांची मागणी वाढतीच राहणार आहे. बारामतीसारख्या ग्रामीण भागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग शिक्षण मिळावे व त्याद्वारे उत्तम योग शिक्षक तयार होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कार्य करावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याचाच एक भाग म्हणून हे योग महाविद्यालय आम्ही सुरू केले आहे, अशी माहिती योगाचार्य डॉ. नीलेश महाजन यांनी दिली.
हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची विविध हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्र, जिम किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये योगशिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते किंवा स्वतःचा योग वर्ग, योगा स्टुडिओ सुरू करू करयाय. केंद्र सरकारच्या नव्याने येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषयाचा समावेश करण्यात येणार आहे, त्यामुळे विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योगअध्यापक म्हणून नियुक्ती होऊ शकते. योगशास्त्र हे एक चिकित्सा शास्त्र म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातही कार्य व संशोधन करण्यासाठी संधी आहे.
भारत सरकारतर्फेही योगशास्त्राचा प्रचार व प्रसारासाठी विविध योजना राबविल्या जातात, यामुळे योगशास्त्राच्या प्रसाराला गती मिळाली आहे, त्यामुळे पारंपरिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये योग शास्त्र विषयातील बी.ए. (योग) व एम. ए. (योग) ही शाखा फायदेशीर आहे. प्रवेश घेण्यासाठी बी. ए. (योग) यासाठी कोणत्याही शाखेतून 12 वी पास व एम. ए. (योग) साठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे, अशी माहिती योगतज्ज्ञ डॉ. भक्ती महाजन यांनी दिली.