येरवडा –आरटीओ फुलेनगर येथे उभारलेला “ब्रेक टेस्ट ट्रॅक’ सध्या वापराविनाच आहे. स्थानिक नगरसेविकेने बांधलेले वाचनालय आणि पानटपरीचे अतिक्रमण या टेस्ट ट्रॅकच्या आऊट गेटला झाले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा हा ट्रॅक वापराविना आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांच्या “ब्रेक टेस्ट’साठी आरटीओने दिवे येथे नवीन ट्रॅकची निर्मिती केली. रिक्षासह सर्व ट्रान्सपोर्ट संवर्ग वाहन पासिंगची कामे तेथे होत आहेत. पण, हे अंतर खूप असल्याने फुलेनगर येथे नवीन ट्रॅकची निर्मिती केली गेली. 250 मीटरचा हा ट्रॅक छोट्या वाहनधारकांसाठी सोईचा ठरणार आहे. येथे रिक्षा तसेच अन्य वाहनांच्या पासिंगची कामे करण्यात येणार आहेत.
मात्र, ट्रॅक बनवूनही अनेक वाहनांची तपासणी आळंदी रस्त्यावरच होते आहे. कारण येथील ट्रॅकवर पासिंग झालेली वाहने बाहेर नेण्यासाठी भिंतीलगत “आउट गेट’ प्रस्तावित आहे. परंतु तेथेच वाचनालय आणि पानटपरी सुरू असल्याने “आरटीओ’ला गेट सुरू करणे शक्य होत नाही.
दरम्यान, “संबंधित टपरीला पालिकेने परवानगी दिलेली आहे. तर, वाचनालय महापालिकेने बांधले आहे. त्यामुळे ते अतिक्रमण नाही. टेस्ट ट्रॅकवरची वाहने सेवा रस्त्यावर येणार असल्याने अपघाताची शक्यता आहे, हे आरटीओच्या लक्षात आणून दिले आहे. ट्रॅकचे आऊट गेट वाचनालय आणि टपरी न हलविता दुसऱ्या बाजूने काढता येईल. माझ्यामुळे ट्रॅकचे काम रखडलेले नाही,’ असा दावा भाजप नगरसेविका शीतल सावंत यांनी केला.
…क्षेत्रीय कार्यालयाकडून दखल नाही
ही अतिक्रमणे हटवण्यासाठी आरटीओने दि. 7 जुलै रोजी मनपाच्या येरवडा-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाला पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, “माझ्याकडे या प्रभागाचा चार्ज शुक्रवारी (दि.23)रोजी आला. त्यामुळे संबंधित प्रकाराची माहिती सोमवारी घेण्यात येईल,’ असे कनिष्ठ अभियंता पंकज दोंदे यांनी सांगितले.