पुणे – इंधन दरवाढीची घौंडदौड सुरूच आहे. पेट्रोल, डिझेलच्या भावात रोजच 20 ते 25 पैशांनी वाढ होत आहे. आठवडाभरात सीएनजीच्या भावातही सुमारे 5 रूपयांची वाढ झाली आहे. तर शनिवारी (दि. 16) पेट्रोल पाठोपाठ शहरात डिझेलच्या लिटरच्या दभावाने शंभरी ओलांडली आहे. वाढलेल्या भावाने वाहन चालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे वाहन चालवायचे की नाही? असा संतप्त सवाल वाहन चालक उपस्थित करत आहेत.
सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांच्या भावना तीव्र आहेत. 31 मे रोजी शंभरी गाठलेल्या पेट्रोलचा दर शनिवारी शहरात 110.92 रूपये, पॉवर पेट्रोलचा दर 114.60 रूपये, डिझेलचा दर 100.08 रूपये, तर सीएनजीचा किलोचा भाव 62.10 रूपये झाला आहे. रोज वाढणाऱ्या भावामुळे एकीकडे सर्वासामान्यांना वाहन चालविणे अशक्य होत आहे. तर दुसरीकडे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही हे भाव परवडणारे नाहीत. त्यामुळे वाहन चालकांने नेमके काय करायच? स्वत:ची वाहने घराबाहेर काढायची नाहीत का? असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करू लागले आहेत.
कोरोनामुळे सर्वांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगणे मुश्लिक झालेल्या काळात आता वाहन चालविणेही अशक्य होत आहे. त्यामुळेच इंधन दरवाढीला कंटाळून अनेक वाहन चालक सार्वजनिक वाहतूकीचा वापर करीत आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक अनेकांच्या सोयीची नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. काही जण केवळ नाईलाज म्हणून वाहन चालवत आहेत. इंधन दरवाढ अशीच कायम राहिल्यास अनेकांना वाहन चालविणे अशक्य होणार आहे.