मुंबई – अभिनेता सनी देओलचा बहूचर्चित ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तब्बल 23 वर्षांनी गदरचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता होती. दिग्दर्शक अनिल शर्मा, सनी देओल आणि अमिषा पटेल आणि त्यांच्या पूर्ण टीमनं या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही केले आहे. तर दुसरीकडे आज यामीचा ‘OMG 2’ हा चित्रपटही रिलीज झाला आहे. मात्र यामीने सनी देओलला त्याच्या चित्रपटासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
यामीने इनस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत सनीला शुभेच्छा दिल्या आहेत. यामीने शेअर केलेल्या फोटोमध्ये गदर 2 मधील सनीचा पोस्टर दिसत आहे. तर यामी तारा सिंह अर्थात सनी देओलचा हँडपंप उखडताना दिसत आहे. तिचा हा गमतीशीर फोटो अनेकांच्या पसंतीस पडत आहे. हा फोटो शेअर करत तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘प्रिय सनी सर आणि गदर 2 च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. मला आशा आहे की OMG 2 आणि गदर 2 हे दोन्ही चित्रपट आमच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतील आणि चित्रपटप्रेमींना थिएटरमध्ये घेऊन जातील.’
दरम्यान, ‘गदर 2′ चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेलचा ‘गदर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. शिख समाजाचा ‘तारासिंग’ आणि इस्लाम धर्मीय ‘सकिना’ यांच्या प्रेमाची कथा तूफान गाजली. 2001 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची आजही मोठी क्रेझ आहे. या चित्रपटाच्या यशानंतर ‘गदर 2’ ची घोषणा करण्यात आल्यानंतर अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
तर लैंगिक शिक्षणावर आधारित OMG 2 चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम, गोविंद नामदेव, अरुण गोविल असे अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.