मुंबई : सागर धनखड हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या कोठडीत असलेल्या पैलवान सुशील कुमारला मोठा झटका बसलाय. आता उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले आहे. त्यामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.
Sushil Kumar (in file pic) suspended from his job at Northern Railways, as criminal offence investigation against him is underway: Deepak Kumar, CPRO, Northern Railways pic.twitter.com/KPTEpOMeuE
— ANI (@ANI) May 25, 2021
23 मे रोजी अटकेनंतर सुशील कुमारला रोहिणी कोर्टाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सागर धनखड हत्या प्रकरणात सुशील कुमारचा असलेला सक्रिय सहभाग पाहता उत्तर रेल्वेने त्याला सेवेतून निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
सागरच्या खून प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेला कुस्तीपटू सुशील कुमार याला सेवेतून निलंबित केले जाईल, अशी घोषणा उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्याने केली. ऑलिम्पिक पुरस्कार विजेता सुशील कुमार हा उत्तर रेल्वेचा वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक आहे. 2015 पासून तो प्रतिनियुक्तीवर दिल्ली सरकारमध्ये आहे. त्याला शालेय स्तरावरील खेळाच्या विकासासाठी छत्रसाल स्टेडियमवर विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केले होते.
सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सागर धनखडला एखाद्या प्राण्याला मारावं तसं मारलं. सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांना त्या भागात आपली दहशत निर्माण करायची होती, असं कोर्टाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी सांगितलं. सुशील कुमार याच्याजवळ एका कुस्ती सर्किटमध्ये दहशत निर्माण करण्याच्या घटनेचा व्हिडिओ होता.
कुस्तीच्या मैदानात आडदांड पैलवानांना लोळवत दोनदा ऑलिम्पिक पदक आणि कॉमनवेल्थमध्ये तिनदा सुवर्णपदक मिळवणारा हरियाणाचा कुस्तीपटूसुशील कुमार पोलिसी खाक्या दिसल्यावर अक्षरशः रडल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमार आणि त्याचा मित्र सहआरोपी अजय बक्करवाला यांना तीन ठिकाणी नेऊन चौकशी करण्यात आली. यात मॉडल टाऊन, शालीमार बाग आणि छत्रसाल स्टेडियम या ठिकाणांचा समावेश आहे.